एलपीजी आणि नैसर्गिक गॅसवरचे निर्बंध हटले!

केंद्राचा मोठा निर्णय

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Restrictions on LPG and natural gas lifted केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या पुरवठ्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेत आणीबाणीच्या परिस्थितीत लागू करण्यात आलेले विशेष निर्बंध मागे घेतले आहेत. यामुळे स्वयंपाकाचा गॅस तसेच नैसर्गिक वायूचे वाटप आणि वितरण आता पुन्हा नियमित पद्धतीने करण्यात येणार आहे. यंदाच्या मार्च महिन्यात संभाव्य गॅस टंचाई लक्षात घेऊन केंद्राने हे विशेष अधिकार स्वतःकडे घेतले होते.त्या वेळी सरकारला विविध क्षेत्रांना किती प्रमाणात नैसर्गिक वायू द्यायचा, याचा निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते. खत उद्योग, सीएनजी-पीएनजी सेवा, वीज निर्मिती आणि इतर अत्यावश्यक क्षेत्रांना गरजेनुसार प्राधान्याने गॅस पुरवठा करता यावा, तसेच संभाव्य टंचाईचा सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम होऊ नये, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश होता.
 
 
एलपीजी आणि नैसर्गिक गॅसवर
 
मात्र, केंद्र सरकारच्या माहितीनुसार सध्या देशातील नैसर्गिक वायूचा पुरवठा पूर्वीपेक्षा स्थिर झाला आहे. देशांतर्गत उत्पादन, आयात आणि वितरण व्यवस्था सुरळीत सुरू असून तातडीच्या गॅस संकटाची कोणतीही शक्यता नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे आणीबाणीच्या तरतुदी कायम ठेवण्याची आवश्यकता उरली नसल्याने त्या मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर नैसर्गिक वायूचे वितरण पुन्हा नेहमीच्या नियमांनुसार केले जाणार आहे. अमेरिका-इराण संघर्षानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव वाढल्यामुळे जागतिक स्तरावर गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर भारताने मार्चमध्ये आणीबाणीचे निर्बंध लागू केले होते. आता अमेरिका आणि इराण यांच्यात ६० दिवसांचा करार झाल्यानंतर अंतिम स्तरावरील वाटाघाटी सुरू आहेत. या चर्चेतून पुढे काय निष्पन्न होते आणि दोन्ही देशांमध्ये कायमस्वरूपी तोडगा किती लवकर निघतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.