वेध...
सोनाली पवन ठेंगडी
Safety of new generation घराघरातून नव्या पिढीवर चांगले संस्कार व्हावेत, नवी पिढी अधिक चारित्र्यवान, सुशिक्षित आणि धाडसी प्रवृत्तीची घडावी, अशी सार्थ अपेक्षा प्रत्येकालाच असते. यापैकी पहिल्या तीन गुणांचे संवर्धन पालक आणि शिक्षक मिळून करतातच. पण, चौथा गुण अर्थात धाडस हा बहुतांश वेळी अंगभूत असतो. अर्थात, काही मुले-मुली परिस्थितीनुरूप धाडसी किंवा भित्रे बनतात. पण, आज आपल्या अपत्यांना मग मुलगा असो वा मुलगी, त्यांना धाडसी बना, हे सांगायचे की नाही, असा प्रश्न पालकांकडून केला जातोय. मुंबईच्या लोकलमध्ये एका तरुणाने दुसऱ्याचा धक्का लागला म्हणून त्याला हटकले तर त्याने त्या तरुणाचा खूनच केला. राजस्थानात एक १३ वर्षीय मुलगी ऑटोने मैत्रिणीकडे जात असताना ऑटोवाल्याने तिला थेट एका हॉटेलमध्ये नेले आणि तिथे तिला विकले. त्या ठिकाणी पाच दिवस ३० जणांनी तिच्यावर अत्याचार केले. तिची कशीबशी सुटका झाली. पण, या निमित्ताने प्रश्न उपस्थित झाला की, आपल्या मुलांना आपण धीटपणे वागायला शिकवायचे की नाही?
आता समाज माध्यमांवरही अशा आशयाच्या रील्स येताहेत की, आपल्या मुलांना सांगा, कोणाशीही क्षुल्लक किंवा अन्य कोणत्याही कारणाने भिडण्यात काही अर्थ नाही. कारण कोण व्यक्ती कोणते शस्त्र बाळगून असेल, कोणत्या मानसिकतेत असेल, शुद्धीवर असेल किंवा नसेल, याचा नेम नाही. आपली चूक नसेल तरीही ‘सॉरी’ हा परवलीचा शब्द बोलून दोन पावलं मागे यावे. हा भित्रेपणा आहे का? तर नक्कीच नाही. हा आजच्या काळात शहाणपणा ठरतोय. कारण यातून किमान पुढील अनर्थ टळू शकतो. सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या बहुतांश लोकांमध्ये प्रचंड उद्दामपणा दिसतो. कोणालाच झुकायचे नाही, माघार घ्यायची नाही. आपली चूक तर कबूल करायचीच नाही. अशात जर कोणी ‘अरे’ला ‘कारे’ केले तर गहजबच होतो. परिणाम काय घडेल, याचा आपल्याला रोजच्या बातम्यांमधून अंदाज बांधता येईल. पण, मग यावर प्रत्येकवेळी आपली चूक नसताना माघार घेणे, समोरच्याची चूक असूनही आपण बॅकफूटवर येणे, हाच मार्ग चोखाळायचा का? उत्तर कठीण आहे. मुळात, असे कोणतेही चित्र उभे राहूच नये, अशी सामाजिक स्थिती निर्माण होणे गरजेचे आहे.
प्रत्येकाने नागरी कर्तव्य म्हणून सर्व नियम पाळले, एकमेकांशी सौहार्द ठेवला तर अशा संघर्षाची वेळच येणार नाही. मग यासाठी सर्वांत आधी गरजेची आहे कायदा, सुव्यवस्था. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, जगात सुमारे पाच हजार प्रकारच्या वेगवेगळ्या भीती माणसाला असू शकतात. मरणाची भीती हा मानवी स्वभाव आहे. याही पुढे जात आता माणसामध्ये कायद्याची भीती निर्माण व्हायला हवी. आखातातील काही संपन्न देश असे आहेत जिथे महिलांविषयीच्या गुन्ह्यांसंदर्भातील कायदे अतिशय कठोर आहेत. अशा ठिकाणी गुन्ह्यांचे प्रमाण साहजिकच कमी आहे. कारण तेथील लोकांना कायद्याची भीती वाटते. आपल्या देशात कायद्याची भीतीच उरलेली नाही, असे खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते. कायदा हा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी नक्कीच नाही. पण, कायदा मोडला तर शासन होईल, हा विश्वास सर्वसामान्यांमध्ये निर्माण व्हायला हवा. कायद्याची सार्थकता यातच आहे की, त्याचा वापर कमी वेळा व्हावा. भीती गुन्हेगारांच्या मनात बसायला हवी. ही जबाबदारी अर्थातच प्रशासकीय व्यवस्थेची आहे.
Safety of new generation भीती ही एक नैसर्गिक आणि प्राथमिक भावना आहे, जी धोक्यापासून बचाव करण्यासाठी देह आणि बुद्धीला सतर्क करते. भीतीची भावना जास्त काळ राहिली तर ती माणसाला दुबळे बनवते. आपल्याला नवीन पिढीमध्ये देह आणि बुद्धीला सतर्क करणारी भीती निर्माण करायची आहे, दुबळी करणारी नाही. एक छोटीशी गोष्ट आहे. एकदा यमाने आपल्या दूतांना रागावले की, तुम्हाला मी ५०० माणसांना घेऊन यायला सांगितले तर मग तुम्ही हजार माणसे का आणली? त्यावर दूत म्हणाले, आम्ही ५०० लोकांचेच प्राण घेतले. पण, उर्वरित ५०० नुसत्या भीतीनेच मेले. म्हणून आपल्या मुलांना शिकवायची तर वाईटाची भीती शिकवावी. अनाठायी धाडस नको आणि अवाजवी भीतीही नको, हा धडा नवीन पिढीसाठी त्यातल्या त्यात योग्य ठरेल.
७७५५९३८८२२