Salekasa संततधार पावसामुळे सालेकसा तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असताना आरोग्य विभागाने दाखविलेल्या तत्परतेमुळे एका गरोदर मातेसह तिच्या गर्भातील बाळाचे प्राण वाचले. प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर भजेपारच्या आरोग्य पथकाने जीवाची पर्वा न करता पूरग्रस्त भागात पोहोचून गरोदर मातेला सुरक्षित स्थळी हलविले. या धाडसी कामगिरीबद्दल आरोग्य विभागावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भजेपार व परिसरातील रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. दरम्यान, गावातील एका गरोदर महिलेची प्रकृती बिघडल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश कटरे, आरोग्य सेविका विद्या बहेकार आणि आशा स्वयंसेविका विनूताई खांडवाये यांनी पूरग्रस्त भागात पोहोचून अत्यंत धाडसाने गरोदर मातेला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. दुर्गम व पूरग्रस्त भागातील नागरिकांपर्यंत वेळेत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या शासनाच्या ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या संकल्पनेला या घटनेतून मूर्त स्वरूप मिळाले आहे. प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्यनिष्ठेने काम करणार्या आरोग्य पथकाचे नागरिकांसह गरोदर महिलेच्या कुटुंबीयांनी मनापासून आभार मानले असून, संपूर्ण सालेकसा तालुक्यात या कार्याचे कौतुक होत आहे.