अकोला,
School in Akola district in the morning मतदार यादीचे सखोल पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत कार्यरत शिक्षकांना निवडणूक कामकाज प्रभावीपणे पार पाडता यावे यासाठी शाळा सकाळच्या सत्रात घेण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी रविवार, ५ जुलै रोजी जिल्हा परिषदेला निर्गमित केले आहेत. सोमवारी शिक्षण विभागाकडून यासंदर्भात शाळांना आदेश जारी करण्यात येतील. भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्याचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (एस.आय.आर) महाराष्ट्र राज्यासह १६ राज्य व ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये घोषित केला आहे. हा कार्यक्रम कालबद्ध असून त्यामध्ये मुदतीत कार्यवाही होणे अपेक्षित आहे.
२९ जुलै, २०२६ या कालावधीमध्ये सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी घरोघर जाऊन गणनापत्र २ प्रतीमध्ये भरून घेणे व त्याचे डिजिटायझेशन करणे अनिवार्य आहे.प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे असलेली मतदार संख्या व घरोघरी जाऊन गणना पत्रक भरणे व डिजिटायझेशन करणे या कामाची एकूण व्याप्ती पाहता नियुक्त केलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना एसआयआर कामाकरिता पुरेसा अवधी देणे आवश्यक आहे. बहुतांशः बीएलओ हे शिक्षक संवर्गातील असल्यामुळे दि. ०७ जुलै, २०२६ ते दि.१८ जुलै, २०२६ या कालावधीत सर्व शाळा सकाळच्या सत्रामध्ये सकाळी ७.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यत भरणेबाबत आवश्यक ते नियोजन करावे. हे करत असतांना सकाळाच्या सत्रातील शाळेच्या कालावधीचे नियोजन नियमित शाळांच्या तासिकांप्रमाणे पूर्ण होईल याप्रमाणे करावे तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेणे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.