श्रीनगर,
Search operation in Shopian जम्मू-काश्मीरमधील दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात लष्कर-ए-तोयबा (LeT) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन स्थानिक दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांची संयुक्त मोहीम सलग चौथ्या दिवशीही सुरू आहे. मीमांदर आणि चानापोरा परिसरातील दाट सफरचंदाच्या बागांमध्ये हे दोघे लपून बसल्याची शक्यता असल्याने संपूर्ण भागात कडेकोट घेराबंदी करण्यात आली आहे.शुक्रवारी सुरक्षा यंत्रणांनी बसवलेल्या फेस-डिटेक्शन कॅमेऱ्यांमध्ये दोन संशयितांचे चेहरे कैद झाल्यानंतर या कारवाईला वेग आला. त्यानंतर भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांनी संयुक्तपणे संपूर्ण परिसर सील करून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली.
रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून आणि अंधाराचा फायदा घेऊन दहशतवाद्यांनी पळ काढू नये, यासाठी शोधमोहीम तात्पुरती थांबवण्यात आली होती. मात्र सोमवारी सकाळी पुन्हा संपूर्ण ताकदीने कारवाई सुरू करण्यात आली. सुरक्षा यंत्रणांनी या दोघांची ओळख लतीफ आणि झाकीर अशी पटवली आहे. जवान संशयितांच्या दिशेने पुढे सरकत असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्याला जवानांनी तात्काळ प्रत्युत्तर दिल्यानंतर परिसरात चकमक सुरू झाली.कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी भारतीय लष्कराच्या स्पेशल व्हिक्टर फोर्सचे अतिरिक्त जवानही तैनात करण्यात आले आहेत. सध्या या भागात दाट जंगल आणि हिरवाई असल्याने शोधमोहीम अत्यंत सावधगिरीने राबवावी लागत आहे. घनदाट वनराईमुळे ड्रोन आणि हवाई पाळत ठेवण्यास अडथळे येत असून, त्याचा फायदा दहशतवाद्यांना लपण्यासाठी आणि हालचाली करण्यासाठी होत असल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरक्षा नोंदींनुसार, लतीफ आणि झाकीर हे दोघेही दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्याचे रहिवासी आहेत. झाकीर हा २०२४ पासून लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असून, लतीफ गेल्या वर्षी या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता.