इस्लामाबाद,
Senior Pakistan Air Force officer assassinated पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये पाकिस्तान हवाई दलाच्या गुप्तचर विभागाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी ग्रुप कॅप्टन असिम तारिक यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने देशात मोठी खळबळ उडाली आहे. हवाई मुख्यालयाबाहेर घडलेल्या या घटनेमुळे राजधानीतील सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे, या हत्येमागील कारणांबाबत वेगवेगळे दावे समोर येत असल्याने या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे.इस्लामाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रुप कॅप्टन असिम तारिक यांनी एका तरुणाला एका युवतीला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवण्याचा प्रयत्न करताना पाहिले. त्यांनी हस्तक्षेप करून आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीने त्यांच्या वाहनाचा पाठलाग करत जवळ येऊन गोळीबार केला, ज्यामध्ये असिम तारिक यांचा जागीच मृत्यू झाला.

मात्र, या घटनेनंतर समोर आलेल्या व्हिडिओमुळे पोलिसांच्या कथनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हिडिओमध्ये असिम तारिक हे कारमधून बाहेर पडले नसल्याचे आणि त्यांनी सीट बेल्टही लावलेला असल्याचे दिसत असल्याने त्यांनी कथित अपहरण रोखण्यासाठी नेमका हस्तक्षेप कसा केला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपीला अटक केल्याचा दावा केला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी एका शोरूममध्ये काम करत होता आणि महिलांना त्रास देत असल्याच्या तक्रारी त्याच्याविरोधात होत्या. शोरूममध्ये नुकत्याच कामावर आलेल्या एका तरुणीला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवण्याच्या प्रयत्नातून झालेल्या वादाचे रूपांतर गोळीबारात झाले, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, काही माध्यमांच्या वृत्तांमध्ये ग्रुप कॅप्टन असिम तारिक यांनी गेल्या महिन्यात अफगाणिस्तानातील एका हवाई कारवाईच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा करण्यात आला आहे. या कारवाईत एका रुग्णालयासह अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते आणि त्यात अनेक अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर या हत्येचा त्या घटनेशी संबंध असू शकतो, अशी चर्चा रंगली असली तरी याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा पाकिस्तानातील पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK), बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा या भागांमध्ये सुरक्षा परिस्थिती आधीच तणावपूर्ण आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलने सुरू असून, बलुचिस्तानमध्ये सुरक्षा दलांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. तसेच खैबर पख्तुनख्वा प्रांतात अफगाण तालिबानकडून पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यांवर आणि चौक्यांवर सातत्याने हल्ले होत असल्याने पाकिस्तानसमोर अंतर्गत सुरक्षेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.