कारंजा लाड,
shiv sena अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील कथीत देणगी गैरव्यवहार आणि मौल्यवान वस्तूंच्या अपहाराच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रविवारी, ५ जुलै रोजी कारंजा येथे रामरक्षा आंदोलन करण्यात आले.
राज्यभर सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून कारंजा शहरात शिवसैनिकांनी एकत्र येत रामरक्षा स्तोत्राचे पठण, जय श्रीरामच्या घोषणा आणि निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेसमोर रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसाचे पठण करून मंदिराच्या पावित्र्याचे रक्षण करण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी जय श्रीराम, हर हर महादेव अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मुंबईतील दादर येथे झालेल्या मुख्य रामरक्षा आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिरातील देणगी गैरव्यवहाराचा तीव्र निषेध नोंदविताना, राम मंदिरातील चोरांना तडीपार केल्याशिवाय स्वस्थ बसू नका. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींना शिक्षा मिळेपर्यंत शिवसेना संघर्ष सुरू ठेवेल, असा इशारा दिला. हिंदू समाजाने जागृत राहून श्रद्धेच्या ठिकाणांचे संरक्षण करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांनी राम मंदिरासाठी देशभरातील रामभक्तांनी श्रद्धेने दिलेल्या देणग्यांचा अपहार हा संपूर्ण हिंदू समाजाच्या भावनांशी खेळ असल्याचे सांगत या प्रकरणातील प्रत्येक दोषीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.
कारंजा येथे मोठ्या राम मंदिरात महाआरती करण्यात आली.त्यानंतर झालेल्या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाध्यक्ष विलास पाटील सुरळकर, दत्ता पाटील तुरक,राजू पाटील ठाकरे,प्रिया महाजन यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच रामभक्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले. आंदोलनाच्या शेवटी प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले. रामरक्षा स्तोत्राच्या सामूहिक पठणानंतर उपस्थितांनी हिंदू समाजाच्या ऐयाचा संकल्प व्यक्त केला.