८ जुलैपासून आझाद मैदानात बेमुदत आंदोलन
४८६० पदे तात्काळ भरा : महासंघाची मागणी
नागपूर,
sports teacher recruitment शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी थेट निगडित असणाऱ्या शारीरिक शिक्षणाकडे राज्य सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपल्या प्रमुख मागण्यांसाठी महासंघाच्या वतीने येत्या बुधवार, ८ जुलै २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. गेल्या २० वर्षांपासून शारीरिक शिक्षण शिक्षकांची भरती रखडल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी या विषयापासून वंचित राहत आहेत. परिणामी शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचा तास केवळ नावापुरताच उरला असल्याचे महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने म्हटले आहे. राज्य सरकारच्या या अनास्थेविरोधात महासंघ आंदोलन करणार आहे, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य धोक्यात
शालेय शिक्षण व्यवस्थेत शारीरिक शिक्षण हा केवळ खेळाचा विषय नसून विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक घटक आहे. याच माध्यमातून भविष्यातील ऑलिंपिकपटूंचा पाया रचला जातो. मात्र राज्यातील हजारो शाळांमध्ये पात्र क्रीडा शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना खेळ, व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्तीचे धडे मिळत नाहीत. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर आणि शालेय क्रीडा स्पर्धांवर होत असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे.
हजारो पदवीधर बेरोजगार
महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दशकांपासून राज्य सरकारने शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदभरतीकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राज्यात हजारो बी.पी.एड आणि एम.पी.एड पदवीधर बेरोजगार आहेत. पात्रता असूनही त्यांना नोकरी मिळत नाही. दुसरीकडे शाळांमधील क्रीडा शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. हा दुहेरी अन्याय असल्याचा आरोप त्यांनी केला.‘सरकार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या गोष्टी करते, पण प्रत्यक्षात क्रीडा शिक्षकच देत नाही. हा दुटप्पीपणा आता सहन होणार नाही‘ असे संघटनेने म्हटले आहे.
महासंघाच्या चार ठळक मागण्या
सेवा नियमावली जाहीर करा : क्रीडा शिक्षकांची सेवा प्रवेश नियमावली आणि सेवा शर्ती तात्काळ जाहीर करून भरती प्रक्रिया सुरू करावी.
४८६० पदे भरा : जानेवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार मंजूर झालेली ४ हजार ८६० क्रीडा शिक्षकांची पदे पवित्र पोर्टलमार्फत पहिल्या टप्प्यात भरावीत.
समायोजन नको : रिक्त होणाऱ्या शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदांवर इतर विषय शिक्षकांचे समायोजन करू नये. ती पदे केवळ पात्र क्रीडा शिक्षकांनीच भरावीत आणि भरती पवित्र पोर्टलमार्फतच व्हावी.
सर्व रिक्त पदे भरा : राज्यातील सर्व शाळा आणि जिल्हा परिषद शाळांमधील शारीरिक शिक्षण शिक्षकांची रिक्त पदे तातडीने पवित्र पोर्टलवर जाहीर करून भरावीत.