ताजमहाल-तेजो महालय वाद पुन्हा चर्चेत!

उच्च न्यायालयाने केंद्र आणि ASI कडे मागितले प्रतिज्ञापत्र

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
प्रयागराज,
Taj Mahal-Tejo Mahal controversy ताजमहाल परिसरात कथित 'तेजो महालय मंदिर' अस्तित्वात असल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या प्रकरणात न्यायालयाने केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (ASI)यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले असून, प्रतिवादी पंकज कुमार वर्मा यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. भगवान श्री अग्रेश्वर महादेव नागनाथेश्वर विराजमान तेजो महालय मंदिर यांच्या वतीने वरिष्ठ वकील हरिशंकर जैन आणि इतरांनी ही याचिका दाखल केली आहे.या प्रकरणाची पार्श्वभूमी २०१५ सालापासून सुरू आहे. आग्रा येथील वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयात दाखल असलेल्या मूळ दाव्यात ताजमहाल संकुलात तेजो महालय मंदिर अस्तित्वात असल्याचे घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
 
tajmahal
 
मुख्य दावा प्रलंबित असताना याचिकाकर्त्यांनी वादग्रस्त जागेचे शास्त्रीय सर्वेक्षण, छायाचित्रण आणि पाहणी करण्यासाठी वकील आयुक्तांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. मात्र, आग्रा येथील वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांनी हा अर्ज फेटाळला. त्यानंतर दाखल करण्यात आलेली पुनरीक्षण याचिकाही अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी ग्राह्य नसल्याचे सांगत फेटाळून लावली.या दोन्ही आदेशांना आव्हान देत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान वरिष्ठ वकील हरिशंकर जैन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बाजू मांडताना, वादाचे निष्पक्ष आणि अंतिम निराकरण करण्यासाठी संबंधित जागेचे सर्वेक्षण आणि छायाचित्रण आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला. कनिष्ठ न्यायालयांनी वकील आयुक्त नेमण्याचा अर्ज फेटाळून चुकीचा निर्णय दिल्याचा दावाही त्यांनी केला. याप्रकरणी केंद्र सरकार आणि ASI यांचे प्रतिज्ञापत्र आल्यानंतर पुढील सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.