तेहरान,
Trump's game over Khamenei's funeral इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या अंत्यविधीच्या पार्श्वभूमीवर नवा राजनैतिक वाद निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या दबावामुळे तब्बल १३ देशांनी या शोकसमारंभापासून स्वतःला दूर ठेवले किंवा आपल्या प्रतिनिधी मंडळांचा स्तर कमी केला, असा गंभीर आरोप इराणने केला आहे. या संपूर्ण घडामोडीला अमेरिकेची "क्षुद्र राजनैतिक खेळी" असे संबोधत तेहरानने वॉशिंग्टनवर थेट निशाणा साधला आहे. इराणच्या तस्नीम वृत्तसंस्थेच्या वृत्ताचा हवाला देत एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, परदेशी प्रतिनिधींचा सहभाग मर्यादित ठेवण्यासाठी अमेरिकेने विशेष राजनैतिक मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत विविध देशांवर दबाव टाकून त्यांना समारंभात सहभागी न होण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

तेहरानमधील इमाम खामेनेई ग्रँड मशिदीत शनिवारी सुरू झालेला अंत्यविधीचा कार्यक्रम ९ जुलैपर्यंत चालणार आहे. त्यानंतर अयातुल्ला खामेनेई यांच्या मूळ गाव असलेल्या मशहद येथे त्यांच्यावर दफनविधी करण्यात येणार असून, त्यानंतर अंतिम धार्मिक विधी पूर्ण होतील. दरम्यान, अनेक देशांची प्रतिनिधी मंडळे तेहरानमध्ये दाखल झाली असली तरी काही देशांनी शेवटच्या क्षणी माघार घेतल्याचे सांगितले जात आहे.अहवालानुसार, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी २६ जून रोजी जगभरातील अमेरिकी दूतावास आणि राजनैतिक मिशनना गुप्त निर्देश जारी केल्याचा दावा करण्यात आला आहे. या निर्देशांद्वारे यजमान देशांना खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचे इराणचे म्हणणे आहे. काही अरब राजनैतिक अधिकाऱ्यांनी तर आफ्रिकेतील अनेक देशांना विकास सहकार्य थांबवण्याची धमकी दिल्याचाही आरोप केला आहे.
तसेच रुबियो यांनी स्वतः पाच अरब देशांशी या विषयावर स्वतंत्र चर्चा केल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे. इराणच्या दाव्यानुसार, या दबावामुळे तीन युरोपीय, पाच आफ्रिकन, पर्शियन आखातातील दोन अरब आणि दोन आशियाई देशांनी आपली भूमिका बदलली. काहींनी समारंभात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला, तर काहींनी प्रतिनिधी मंडळाचा दर्जा कमी केला. दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे केलेल्या हवाई हल्ल्यात अयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचे पुत्र मोजतबा खामेनेई यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याची जबाबदारी स्वीकारली असून, सध्या देशाचे नेतृत्व त्यांच्या हाती आहे.