भंडारा
nagar panchayat लाखनी नगर पंचायतीच्या निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिले असताना, सत्ताधारी आणि विरोधकांची एकजूट दिसून आली! दोन पदाधिकारी आणि बाकी सदस्य असा सामना रंगला! आज या सामन्यात पारीत झालेल्या अविश्वासामुळे लता रोडे यांची उपाध्यक्षपदाची "इनिंग" संपली! 14 सदस्यांची खेळी यशस्वी ठरली. आता उद्या 7 रोजी नगर पंचायतिच्या अध्यक्षांना त्याच 14 खेळाडूंचा सामना करावयाचा असून त्यांची इनिंग सुद्धा संपण्याची शक्यता प्रबळ झाली आहे. त्यामुळे उद्या अध्यक्षांवरील येणाऱ्या अविश्वासाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

nagar panchayat विधान परिषदेची निवडणूक झाली आणि लाखनी नगर पंचायततीतील पदाधिकाऱ्यांच्या विरोधात अविश्वासाचे वारे वाहू लागले. नगराच्या विकासासाठी कदाचित सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सदस्य एकत्र आले असतील, पण अविश्वास आणण्यासाठी मात्र सर्वांनी दाखविलेली एकजूट कमालीची आहे. आधी नगराध्यक्ष त्रिवेणी पोहरकर यांचे विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर उपाध्यक्ष लता रोडे त्यांच्यावर अविश्वास आणण्यासाठी दुसरे निवेदन दिले गेले. दोन्ही निवेदनांवर प्रत्येकी 13 सदस्यांच्या सह्या होत्या.
nagar panchayat आज उपाध्यक्ष लता रोडे त्यांच्यावरील अविश्वासा संदर्भात मतदानासाठी विशेष सभा जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित केली होती. यात 17 पैकी 14 सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने, म्हणजेच उपाध्यक्षांच्या विरोधात मतदान करून त्यांच्यावर सदस्यांचा विश्वास नसल्याचे स्पष्ट केले. अविश्वास प्रस्ताव पारित झाल्याने लता रोडे यांना उपाध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागले. आगामी निवडणुकांना अवघे काही दिवस बाकी असताना उपाध्यक्षांची इनिंग आज संपली.
nagar panchayat दरम्यान आज उपाध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव पारित झाला. उद्या 7 रोजी नगर पंचायतीच्या अध्यक्ष त्रिवेणी पोहरकर यांच्याविरुद्ध दाखल अविश्वासासाठी विशेष सभा होणार आहे. त्या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ज्या पद्धतीने सदस्यांनी खेळी केली, ते पाहता उद्याही हेच चित्र पाहायला मिळेल यात शंका नाही. उलट यात एका खेळाडूची भर पडून 14 ऐवजी 15 विरुद्ध 2 असा सामना सुटण्याची शक्यता आहे. हे झाल्यास अध्यक्षांची इनिंगही उद्या संपेल.