श्रीलंकेच्या तुरुंगात भीषण संघर्ष; चार रक्षकांसह २५ ठार

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
कोलंबो,
Violent clash in a Sri Lankan prison श्रीलंकेतील नेगोंबो येथील मुख्य कारागृहात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या भीषण संघर्षाने संपूर्ण देश हादरला आहे. अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित दोन प्रतिस्पर्धी गटांमध्ये सुरू झालेला वाद अल्पावधीतच हिंसक दंगलीत बदलला. या रक्तरंजित संघर्षात २५ कैद्यांचा मृत्यू झाला असून चार तुरुंग रक्षकांनाही जीव गमवावा लागला. तसेच १०० हून अधिक कैदी आणि रक्षक जखमी झाले आहेत. राजधानी कोलंबोपासून उत्तरेला असलेल्या नेगोंबो कारागृहात रविवारी रात्री हा संघर्ष सुरू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, अमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असलेल्या दोन गटांतील वाद सोमवारी सकाळपर्यंत चिघळत गेला आणि त्याचे मोठ्या दंगलीत रूपांतर झाले.
 
 

Violent clash in a Sri Lankan prison 
घटनेनंतर जखमींना तातडीने नेगोंबो सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाचे संचालक पुष्पा गमलथ यांनी सांगितले की, अनेक जखमींची प्रकृती गंभीर आहे. काहींना गोळ्या लागल्या असून, तर काहींवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता.अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही घटना गेल्या पाच वर्षांतील श्रीलंकेतील सर्वात भीषण तुरुंग दंगल मानली जात आहे. नेगोंबो कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने तेथे प्रचंड गर्दी असून, त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवरही मोठा ताण असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर तुरुंग परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, हिंसाचाराचे नेमके कारण आणि जबाबदार व्यक्तींचा शोध घेण्यासाठी श्रीलंकन प्रशासनाने सखोल चौकशी सुरू केली आहे.