लंडन,
virats record has finally been broken ऑस्ट्रेलियाची अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज बेथ मूनी हिने आयसीसी महिला टी-20 विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करत क्रिकेटविश्वात नवा विक्रम आपल्या नावावर केला. रविवारी (५ जुलै) लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्ध झालेल्या अंतिम लढतीत मूनीने अवघ्या ४९ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने ६४ धावांची दमदार खेळी साकारली. तिच्या या शानदार फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १५१ धावांचे लक्ष्य ७ गडी राखून सहज पार करत विश्वविजेतेपद पटकावले.
या अर्धशतकासह बेथ मूनीने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याचा मोठा विक्रम मागे टाकला. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तीन वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारी ती पुरुष आणि महिला क्रिकेटमधील पहिली खेळाडू ठरली आहे. यापूर्वी विराट कोहली, कुमार संगकारा आणि मार्लन सॅम्युअल्स यांनी टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यांत प्रत्येकी दोन अर्धशतके झळकावली होती. महिला क्रिकेटमध्ये मूनीशिवाय अन्य कोणत्याही खेळाडूला अंतिम सामन्यात एकापेक्षा जास्त अर्धशतके करता आलेली नाहीत.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यांमध्ये बेथ मूनीची सातत्यपूर्ण कामगिरी विशेष ठरली आहे. २०२० मध्ये मेलबर्न येथे भारताविरुद्ध तिने नाबाद ७८ धावा, २०२३ मध्ये केपटाऊन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद ७४ धावा, तर आता २०२६ च्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध ६४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या तिन्ही डावांमुळे ऑस्ट्रेलियाच्या विजेतेपदाच्या मोहिमेत तिचा मोठा वाटा राहिला.
अंतिम सामन्यात मूनीने फोबी लिचफिल्ड हिच्यासोबत दुसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी रचत संघाचा विजयाचा पाया रचला. तिच्या शानदार कामगिरीची दखल घेत तिला अंतिम सामन्यासाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' आणि संपूर्ण स्पर्धेतील सातत्यपूर्ण उत्कृष्ट फलंदाजीबद्दल 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. विश्वचषकभर प्रभावी फलंदाजी करत बेथ मूनीने पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले.