वायगाव हळदीला सोन्याचे दिवस

भौगोलिक मानांकनानंतर वाढली मागणी; प्रक्रिया उद्योग उभारणीला गती

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
समुद्रपूर,
turmeric भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त वायगाव हळदीच्या लागवडीला समुद्रपूर तालुक्यात आता वेग आला असून आकर्षक रंग आणि औषधी गुणधर्मांमुळे या हळदीची देशभरात मागणी वाढत आहे. कृषी विभागाकडून लागवड क्षेत्र विस्ताराबरोबरच प्रक्रिया उद्योग उभारणीसाठीही प्रयत्न सुरू असल्याने शेतकर्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
 

waigaon gi turmeric demand rises after geographical indication tag 
खैरगाव येथील महिला शेतकरी शोभा गायधने यांच्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ट्रॅक्टरद्वारे वायगाव हळदीची लागवड करण्यात आली. या शेताला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरिकर यांनी भेट देऊन लागवडीची पाहणी केली. हळद लागवड क्षेत्र वाढविण्यासह गुणवत्तापूर्ण उत्पादन, मूल्यवर्धन आणि प्रक्रिया उद्योगावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.प्रस्तावित यंत्रसामग्रीची पाहणी स्मार्टचे नोडल अधिकारी रोहन झंझारे, जिल्हा मृद सर्वेक्षण अधिकारी सागर साळुंखे आणि राहुल वादिले यांनी केले.समुद्रपूर तालुक्यातील वायगाव व परिसरातील शेतकरी अनेक पिढ्यांपासून स्थानिक वायगाव जातीच्या हळदीची लागवड करीत आहेत. भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर या हळदीला स्वतंत्र ओळख मिळाली असून इतर हळदीच्या तुलनेत बाजार भाव जास्त मिळत आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकरी या पिकाकडे वळत आहेत.
वायगाव हळद ही आकर्षक रंग, नैसर्गिक सुगंध आणि औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. या हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण साधारण ५.५ ते ८ टक्क्यांपर्यंत आढळते तर इतर अनेक हळदीच्या जातींमध्ये हे प्रमाण दोन ते चार टक्क्यांच्या दरम्यान असते. जावळी, भेंडी आणि वामणी हे वायगाव हळदीचे प्रमुख प्रकार मानले जातात. उच्च दर्जामुळे औषधनिर्मिती, अन्नप्रक्रिया आणि आरोग्यवर्धक उत्पादनांसाठी या हळदीची मागणी वाढत आहे.
भौगोलिक मानांकनानंतर केवळ कच्च्या हळदीची विक्री न करता स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग उभारण्यावर भर दिला जात आहे. हळद स्वच्छ करणे, उकळणी, वाळवण, पॉलिशिंग, पावडर निर्मिती आणि आकर्षक पॅकिंग अशा प्रक्रियांमुळे उत्पादनाचे मूल्य वाढणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना अधिक दर मिळण्यास मदत होईल. त्याचबरोबर वायगाव हळदीला देशांतर्गत तसेच निर्यात बाजारपेठेत अधिक सक्षम ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.