वाशीम,
washim collector मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत. अचूक मतदार यादी ही सक्षम आणि सुदृढ लोकशाहीचा भक्कम पाया आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नियुक्त करण्यात आलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी भेट देऊन मतदारांची माहिती पडताळत असून, गणना प्रपत्र भरून घेण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर ही मोहीम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत आहे. प्रत्येक पात्र मतदाराची माहिती अचूकपणे मतदार यादीत समाविष्ट व्हावी, आवश्यक दुरुस्त्या वेळेत पूर्ण व्हाव्यात आणि भविष्यातील निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व विश्वासार्ह व्हावी, या उद्देशाने प्रशासनाकडून विविध स्तरांवर समन्वयाने कार्यवाही सुरू आहे.मोहिमेदरम्यान बीएलओ नागरिकांच्या घरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेत आहेत. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देत सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी केले.
विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी विरेंद्र जाधव उपस्थित होते. तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि संबंधित अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.