अनिल कांबळे
नागपूर,
horrific accident रस्त्यावरून धावत्या स्कूल बसचे मागचे चाक अचानक निखळून थेट समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडकले. हे अवजड चाक डोक्यावरून गेल्यामुळे दुचाकीस्वार तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवार, ५ जुलै रोजी सायंकाळी घडली. या भीषण अपघातामुळे स्कूल बसच्या ‘फिटनेस’ आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या तांत्रिक तपासणी मोहिमेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, सावली खुर्द येथील रहिवासी असलेले नामदेव महादेव घागरे हे रविवारी सायंकाळी आपल्या दुचाकीवरून कोंढाळीहून घराकडे परतत होते. ते खापरी परिसराजवळ आले असता, मागून येणाऱ्या एका खाजगी स्कूल बसच्या डाव्या बाजूचे पाठीमागील चाक अचानक धावत्या गाडीतून निखळले. बसचा वेग जास्त असल्याने ते चाक अत्यंत वेगाने रस्त्यावरून पुढे घसरत गेले आणि थेट समोरून येणाऱ्या नामदेव यांच्या दुचाकीला धडकले. वेग इतका प्रचंड होता की, ते चाक नामदेव यांच्या डोक्यावरून गेले. अपघात इतका भीषण होता की, गंभीर दुखापत झाल्याने नामदेव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
हा भयानक अपघात डोळ्यांसमोर घडताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. मात्र, नामदेव यांचा श्वास तोपर्यंत थांबला होता. या घटनेची माहिती मिळताच कोंढाळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
कुटुंबाचा एकमेव आधार हरपला
मृत नामदेव घागरे हे त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन निष्पाप मुली असा परिवार सोडून गेले आहेत. ते कुटुंबातील एकमेव कमावते पुरुष होते. त्यांच्या अकाली आणि अत्यंत दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वाहन चालकाची किंवा बस मालकाचा तांत्रिक निष्काळजीपणा निष्पाप नागरिकाचा जीव कसा घेऊ शकते?, असा संतप्त सवाल नातेवाईक आणि ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
आरटीओच्या फिटनेस मोहिमेचे 'पोकळ' दावे?
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याच्या पृष्ठभूमीवर, पोलिस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागाने शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या सर्व स्कूल बस आणि वाहनांची काटेकोर तांत्रिक तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली होती. वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र असणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यावर धावणाऱ्या स्कूल बसचे चाक थेट धावताना निखळत असेल, तर या तपासण्या केवळ कागदावरच झाल्या होत्या का? असा गंभीर प्रश्न आता पालकांमधून विचारला जात आहे.