नागपूर,
airport to get a new look जीएमआर एअरपोर्ट्स लिमिटेडने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा संपूर्ण कायापालट करण्याचे काम हाती घेतले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात १ हजार ३०० कोटींची कामे होणार असल्याने विमानतळाला नवीन लुक मिळणार असल्याची माहिती जीएमआर एअरपोर्ट्सचे कार्यकारी संचालक एस. जी. के. किशोर यांनी दिली.
विमानतळाचा चेहरा मोहरा बदलणार
मध्य भारतातील सर्वात मोठी विमान वाहतूक, कार्गो हब आणि एरोसिटी विकसित करण्यासाठी जीएमआर एअरपोर्ट्सने प्रत्यक्ष कामास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात प्रवासी क्षमता वाढविण्यासोबतच नागपूरसह विदर्भ तसेच आसपासच्या परिसरात विमान वाहतूक आणि लॉजिस्टिक्स प्रवेशद्वार म्हणून विकसित करण्यासाठी प्राधान्य दिल्या जात आहे. जीएमआर एअरपोर्ट्स कडून नागपूर विमानतळासाठी बहुपदरी विस्तार आणि आधुनिकीकरणाचा विकास आराखडा जाहीर करण्यात आला आहे. आगामी वर्षभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा चेहरा मोहरा बदललेला दिसून येणार आहे.
वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता वाढणार
अत्याधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत विकास आणि जागतिक दर्जाच्या प्रवासी सुविधांवर विशेष भर देत पुढील आठ वर्षामध्ये तीन टप्प्यात विकास कामे पूर्ण केल्या जाणार आहे. विमानतळावरील विकास कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करीत असताना विमानतळाची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता सध्याच्या ३० लाख प्रवाशांवरून ३ कोटी प्रवाशांपर्यंत वाढविण्याची योजना आहे. तसेच उपलब्ध जमीन लक्षात घेता ही क्षमता भविष्यात ५ कोटी प्रवासी प्रतिवर्ष इतकी वाढविण्याचीही क्षमता या प्रकल्पात आहे.
कार्गो आणि लॉजिस्टिक्स हबचा विकास
नागपूर विमानतळाला प्रमुख कार्गो आणि लॉजिस्टिक्स हब म्हणून विकसित करण्याचे नियोजन असल्याने विमानतळाची वार्षिक १ लाख ५० हजार मेट्रिक टन कार्गो हाताळणी क्षमता राहणार आहे. जागतिक दर्जाच्या आधुनिक सुविधांद्वारे विमानतळावर हरित ऊर्जेचा वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंग, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा आदी विकासाला या आराखड्यात स्थान देण्यात आले आहे.
व्यापार, पर्यटन आणि गुंतवणुकीला चालना
जीएनआयएएलकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या १ हजार हेक्टर जमिनीपैकी जवळपास १०० हेक्टर क्षेत्र सिटी-साइड डेव्हलपमेंट साठी राखीव ठेवण्यात आले आहे. या विकासामुळे व्यावसायिक उपक्रम, रोजगारनिर्मिती आणि प्रादेशिक आर्थिक विकासासाठी नवीन संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. जागतिक दर्जाच्या सर्व सुविधा नागपूर विमानतळावर आगामी काळात उपलब्ध होणार असल्याने विमान वाहतूक आणि लॉजिस्टिक्स हबमुळे व्यापार, पर्यटन आणि गुंतवणुकीला चालना मिळेल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत भांडारकर यांनी व्यक्त केला.