वर्धा,
shyam kale संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार, कर्मचारी, कंत्राटी, हमाल, बांधकाम, अंगणवाडी, आशा व इतर श्रमिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर व्यापक जनआंदोलन उभारून लढा अधिक तीव्र करू, असा इशारा आयटकचे राज्य सरचिटणीस श्याम काळे यांनी दिला. केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांना व चार श्रमसंहितांना संघटितपणे विरोध करण्याचा निर्धारही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
आयटकचे राज्यस्तरीय दोन दिवसीय शिबिर व बैठक येथील बच्छराज धर्मशाळा सभागृहात उत्साहात पार पडली. त्यावेळी ते समारोपीय कार्यक्रमात बोलत होते. व्यासपीठावर आयटकचे राष्ट्रीय सचिव सुकुमार दामले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, राष्ट्रीय सचिव बबली रावत, सी. जे. जोसेफ, आयटकचे राज्य सचिव प्रा. राम बाहेती, नामदेव चव्हाण, अॅड. माधुरी क्षीरसागर, राजू देसले आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी कामगार कायदे, चार श्रमसंहिता, सामाजिक सुरक्षा, असंघटित कामगारांचे हक्क, महिला कामगारांचे प्रश्न, संघटन बांधणी व भविष्यातील आंदोलनाची दिशा यासह विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
शिबिरादरम्यान अनेक महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. केंद्र सरकारने लागू केलेल्या चार श्रमसंहितांचा पुनर्विचार करावा, कंत्राटी व असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा, किमान वेतन व रोजगाराची हमी द्यावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, महागाईवर नियंत्रण आणावे, सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण थांबवावे, आशा गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना निवडणूक shyam kale काम सक्ती करू नये, त्यांना पेन्शन सामाजिक सुरक्षा द्यावी तसेच सर्व श्रमिकांच्या न्याय मागण्या तातडीने मान्य कराव्यात या प्रमुख मागण्यांचा ठरावांमध्ये समावेश करण्यात आला.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संघटन विस्तार, कामगार जनजागृती आणि विविध प्रश्नांवर व्यापक आंदोलन उभारण्याचा निर्धार या शिबिरात व्यक्त करण्यात आला.
राज्य कार्यकारणी बैठकीत दिलीप उटाणे, शिवकुमार गणवीर, सदाशिव निकम, रमेश सहस्त्रबुद्धे, मिलिंद रानडे, होस्टलाल राहंगडाले, विजय बचाटे, विनोद झोडगे, देवराव चावले, नयन गायकवाड, मंजू वर्मा आदी पदाधिकारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मनोहर पचारे, वंदना कोळणकर, विजया पावडे, मैना उईके, अलका भानशे, अरुणा नागोसे, गोदावरी राऊत, सुषमा ढोक, राजेश फाले, आदींनी सहकार्य केले. या शिबिरात राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी सहभाग घेतला.