आळंदी,
Alternative routes in Alandi Palkhi संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पायी वारीच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदीत प्रशासन आणि देवस्थानकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीला पूर आला होता. त्यामुळे पुण्याकडे जाणारे आळंदी शहरातील तिन्ही पूल पाण्याखाली गेले होते. मात्र, मंगळवारी सकाळी सुमारे १० वाजल्यापासून नदीच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे.बुधवारी (दि. ८) दुपारी ३ वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्यानंतर पालखीचा रात्री आळंदीतील आजोळघरी मुक्काम असेल. गुरुवारी (दि. ९) सकाळी सुमारे ६ वाजता पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील पूल सुरक्षितपणे वाहतुकीसाठी खुले असणे अत्यावश्यक मानले जात आहे.
सध्या पाणी ओसरत असले तरी मावळ परिसर आणि आळंदी पंचक्रोशीत अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्याने प्रशासन सतर्क आहे. पाण्याची पातळी पुन्हा वाढून पूल बंद ठेवावे लागल्यास पर्यायी मार्गाचा वापर करण्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे.आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नदीवरील चऱ्होली खुर्द-चऱ्होली बुद्रुक जोडणारा पूल, चऱ्होली बायपास रस्ता, चऱ्होली फाटा आणि पुढे थोरल्या पादुका मंदिर असा पर्यायी मार्ग विचाराधीन आहे. बुधवारी पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.
दरम्यान, शहरातील पाणी ओसरल्यानंतर आळंदी नगरपरिषद प्रशासनाने स्वच्छता आणि दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. इंद्रायणी नदीवरील पुलावर साचलेली जलपर्णी हटविणे, तुटलेले कठडे दुरुस्त करणे आणि पालखी मार्ग सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.पालखी सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी देवस्थान आणि पोलिस प्रशासनामध्ये समन्वयाने नियोजन सुरू असून, मंगळवारी देऊळवाड्यात तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पालखी मार्ग, सुरक्षाव्यवस्था आणि पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. इंद्रायणी नदीचे पाणी काहीसे कमी झाले असले तरी परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील २४ तास प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.