अमरावती,
anil-bonde : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नेटवर्कची वर्षानुवर्षांची डोकेदुखी आता कायमची मिटणार आहे. जिल्ह्यातील दुर्गम आणि शेवटच्या गावांपर्यंत डिजिटल कनेक्टिव्हिटी पोहोचवण्यासाठी राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी थेट बीएसएनएल प्रशासनालाच ॲक्शन मोडवर आणले आहे.
खासदार बोंडे यांच्या उपस्थितीत मंगळवारी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीत जिल्ह्यातील नेटवर्क नसलेल्या ५ प्रमुख ग्रामीण भागांत युद्धपातळीवर नवीन मोबाईल टॉवर उभारण्याचा निर्णय घेतला. आजच्या डिजिटल युगातही जिल्ह्यातील अनेक गावांना मोबाईल नेटवर्कसाठी कसरत करावी लागत आहे. ऑनलाईन बँकिंग, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि शासकीय योजनांचे लाभ घेताना नेटवर्कअभावी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. हीच बाब लक्षात घेऊन खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांची कसून चौकशी केली आणि ‘नो नेटवर्क झोन’ असलेल्या भागांची यादीच अधिकाऱ्यांसमोर ठेवली.
बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेअंती सिटीलँड मार्केट (बोरगाव धर्माळे), सालोरा खुर्द (ता. अमरावती), वऱ्हाणपूर (ता. मोर्शी), कोडवर्धा (ता. चांदूरबाजार), कापूस तळणी (ता. अंजनगाव सुर्जी) याठिकाणी टॉवर बसवण्यात येत असून कनेक्टिव्हिटीचा प्रश्न सुटणार आहे.
//शहरातील निष्क्रीय खांब तत्काळ हटवा
फक्त ग्रामीण भागच नव्हे, तर अमरावती शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही या बैठकीत ऐरणीवर आला. शहरात अनेक ठिकाणी बीएसएनएलचे जुने आणि निष्क्रीय झालेले खांब उभे आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघाताची भीती वर्तवली जात आहे. हे सर्व निरुपयोगी खांब तातडीने हटवून नागरिकांची अडचण दूर करण्याचे कडक निर्देश खासदार बोंडे यांनी दिले.
डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी कटिबद्ध
ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांना आज डिजिटल प्रक्रियेत जोडणे अत्यंत गरजेचे आहे. नेटवर्कअभावी एकाही नागरिकाचे काम अडता कामा नये. अमरावती जिल्ह्यातील ज्या ग्रामीण भागात अजूनही नेटवर्क पोहोचलेले नाही, तिथे प्राधान्याने बीएसएनएलचे टॉवर उभारले जातील. शेवटच्या नागरिकापर्यंत डिजिटल कनेक्टिव्हिटी पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
- डॉ. अनिल बोंडे, खासदार, राज्यसभा