लुटमारीतून जिवे मारणार्‍यांना अटक

जप्त ऑटो आणि लुटारूंसह पोलिस पथक

    दिनांक :08-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
crime-news : एका युवकाला जबरीने ऑटोत कोंबून जबर मारहाण केल्यानंतर त्याला ऑटोतून बाहेर फेकून त्याचा खून करण्यात आला. या हत्याकांडात गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने तीन आरोपींना अटक केली. मो. आसिफ साजीद शेख (२३) गरीब नवाज चौक, खरबी रिंग रोड आणि प्रफुल्ल उर्फ पप्प्या ताराचंद चौधरी (३०) जानगाव कोमटी, ता. चिमूर (जि. चंद्रपूर), मो. आसिफ उर्फ मोनू उर्फ चावल मो. रशिद (२८) अवलीयानगर, मोठा ताजबाग अशी आरोपींची नावे आहेत. हेमलाल राजेंद्र घृतलहरे (३२, छत्तीसगड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
 
 

Crime-Branch-(1) 
 
 
हेमलाल घृतलहरे हा आदमशहा चौक येथे सेंट्रींगच्या कामाला होता. काम करून तो तेथेच राहत होता. २७ जूनच्या रात्री तो गावाला जाण्यासाठी निघाला. गंगाजमुना चौक ते आदमशहा चौक दरम्यान तो पिशवी घेऊन रस्त्याने पायीच जात होता. त्यावेळी ऑटोतून आलेल्या आरोपींनी त्याला जबरीने ऑटोत बसविले. त्याच्या खिशातून व बॅगमधून दोन हजार रुपये जबरीने हिसकावून घेतले. हेमलाल हा आरडाओरड करीत असताना आरोपींनी त्याला मारहाण केली. हेमलाल बेशुद्ध झाल्यावर त्याला ऑटोतून बाहेर फेकले आणि आरोपी पळून गेले. हेमलाल हा टेलिफोन एक्सचेंज चौक ते गंगाबाई घाट चौकातील उड्डाणपुलाखाली पडून होता. अज्ञात दोन व्यक्तींनी त्याला उचलून गंगाबाई घाट चौकातील एनएचएस हॉस्पिटल येथे आणले. हेमलालला दवाखान्यात भरती करून दोघेहीजण पळून गेले. उपचारादरम्यान सकाळी दहाच्या सुमारास हेमलालचा मृत्यू झाला. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता.
 
 
युनिट तीनचे पोलिस निरीक्षक अतुल मोहनकर यांच्या पथकाने त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता धावत्या ऑटोतून हेमलाल हा सिमेंट रस्त्यावर पडलेला दिसून आला. त्यावेळी घटनास्थळाहून एमएच ४९ एआर ४४८६ क्रमांकाचा ऑटो जाताना दिसला. पोलिसांनी ऑटोचा शोध घेऊन मालकाला विचारपूस केली असता घटनेच्या दिवशी मो. आसिफ यास ऑटो भाड्याने दिल्याचे सांगितले. पोलिसांनी आसिफला ताब्यात घेतले असता त्याने अन्य दोन आरोपींची नावे सांगितली. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक केली.