गांजाची तस्करी करणार्‍या ट्रकचालकासह तिघांना अटक

    दिनांक :08-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
smuggling-cannabis : ट्रकमधून ओरिसा येथून गांजा आणून नागपुरात विक्री करणार्‍या ट्रकचालकासह तिघांना कळमना पोलिसांनी अटक करून त्यांच्या ताब्यातून ट्रक आणि दुचाकीसह ३३.४१ लाखांचा माल जप्त केला.
 
 
 
ngp
 
 
बुधवारच्या रात्री सव्वादोनच्या सुमारास कळमना ठाण्याचे बिट मार्शल सर्जा बार चौक ते चिखली चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर पॅट्रोलिंग करीत होते. त्याचवेळी काली माता मंदिराजवळून एक इसम दुचाकीच्या पायदानावर पोते ठेवून जाताना दिसला. पोलिसांनी दुचाकीस्वाराला थांबवून विचारपूस केली असता त्याने आपले नाव रिंकू सुरेश राजपूत (३०) मयूरनगर, कपिलनगर असे सांगितले. त्याच्याजवळील पोत्याची तपासणी केली असता त्यात ४ किलो ३०८ ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी रिंकूची विचारपूस केली असता त्याचा ओळखीचा गुरूप्रितसिंग नावाच्या ट्रकचालकाने चिखली येथे गांजाचे पोते दिल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे ट्रक घेऊन तो ऑटोमोटिव्ह चौकाकडे गेल्याचे सांगितले.
 
 
लगेच पोलिसांनी सापळा रचून कामठीकडे जाणार्‍या रस्त्यावर ओडी ०५ एएक्स ६१४० क्रमांकाच्या ट्रकला अडविले. पोलिसांनी ट्रकचालक गुरूप्रितसिंग सुरजीत मुलतानी (४३) संजीवनी क्वॉर्टर, यशोधरानगर आणि बाल्या सुभाष भडके (४०) भदंत आनंद कौसल्यायननगर, पिवळी नदी यांना ताब्यात घेतले. ट्रकच्या कॅबिनमधून पोलिसांनी ६ किलो १२४ ग्रॅम गांजा जप्त केला. पोलिसांनी १०.४३२ किलो गांजा, तीन मोबाईल, दुचाकी आणि ट्रक असा ३३.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कळमना पोलिसांनी गुन्हा नोंदवून तीनही आरोपींना अटक केली.