रायपूरपासून ‘लोकेशन ट्रेस’; वर्धेत दाखल होताच ‘ट्रॅप’
२१.४८८ किलो गांजासह चौघांना अटक
दिनांक :08-Jul-2026
Total Views |
वर्धा,
cannabis smuggling ओडिसातून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने पाळत ठेवली. तस्करांचे रायपूरपासून लोकेशन ट्रेस केले अन् वर्धेत दाखल होताच नालवाडी चौकात सापळा रचून गांजा तस्करांना ट्रॅप केले. ही कारवाई बुधवार ८ जुलै रोजी सकाळच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या कारवाईत २१ किलो ४८८ ग्रॅम गांजा, महागडी कार जप्त करून चौघांना अटक केली. विशेष म्हणजे, तस्करांमध्ये दोन तरुणींचाही समावेश आहे.
वर्धेत दारू, गांजा आणि एमडी ड्रग्ज तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, ओडिसा राज्यातून वर्धेत गांजाची मोठी खेप येत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ‘अलर्ट मोड’वर आले. गुन्हे शाखेने तांत्रिक संसाधनाचा वापर करीत तस्करांचे रायपूरपासून लोकेशन ट्रेस केले. सुरुवातीला गांजा रेल्वेने आला. त्यानंतर नागपूर येथुन महागड्या कारने वर्धेत दाखल होत असल्याचे लक्षात येताच नालवाडी चौकात सापळा रचला. संशयित एम. एच. ३२ ए. एच. ६९८६ क्रमांकाचे वाहन दिसताच थांबवून झडती घेतली. कारमध्ये दोन तरुणी होत्या. झडती दरम्यान कारच्या डिक्कीमध्ये गांजा आढळून आल्याने दोन तरुणांसह दोन तरुणींनाही ताब्यात घेतले.
या कारवाईत अमिर नसिब खाँ पठाण (३०) रा. इंदिरा झोपडपट्टी आर्वी नाका वर्धा, सूरज चव्हाण (२०) शिवनगर वर्धा, कल्याणी निकोसे (१८) आणि उत्कर्षा किरणाके (१९) दोन्ही रा. मनिषनगर नागपूर या चौघांनाही अटक केली. सदर गांजाचा माल हा अमिर पठाण, त्याचे साथीदार तौसिफ बेग व छन्ना या टोपण नावाने ओळखला जाणाऱ्या इसमाच्या मालकीचा असून ते तिघेही गांजा विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती चौकशीदरम्यान मिळाली. गांजा ओडिसा राज्यातील काटापंजी येथील मदनसा नावाच्या इसमाकडून खरेदी केल्याचेही तपासात निष्पन्न झाले.
तस्करांकडून २१ किलो ४८८ ग्रॅम गांजा, कारसह २२ लाख ३७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ७ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक सिनूकुमार बानोत, मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, महादेव सानप, रवी पुरोहित, सागर भोसले, अक्षय राऊत, अनूप कावळे, अभिषेक नाईक, विनोद कापसे, हर्षल सोनटक्के, स्मिता महाजन आदींनी केली.