चंद्रपूर-मूल महामार्गावर दुर्मीळ ‘चांदी अस्वाला’चा अपघाती मृत्यू

    दिनांक :08-Jul-2026
Total Views |
चंद्रपूर, 
chandrapur-mool-highway : चंद्रपूर-मूल राष्ट्रीय महामार्गावरील आगडी गावाजवळील जानाळा बीट, कक्ष क्रमांक 714 मध्ये बुधवार, 8 जुलै रोजी वाहनाच्या धडकेत एका दुर्मीळ नर चांदी अस्वलाचा मृत्यू झाला. या महामार्गावर आतापर्यंत चार चांदी अस्वलांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद असल्याने वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
 

j 
 
हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे सदस्य शशांक मोहरकर हे या मार्गाने जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला अस्वल मृतावस्थेत दिसले. त्यांनी तातडीने संस्थेचे अध्यक्ष दिनेश खाटे, सदस्य नाजिश अली यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत चिचपल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयाशी संपर्क साधला. माहिती कळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृत अस्वलाचा ताबा घेत पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली. चंद्रपूर-मूल महामार्ग हा विदर्भातील महत्त्वाचा वन्यजीव भ्रमणमार्ग मानला जातो. हा मार्ग कावल व्याघ्र प्रकल्प, कन्हाळगाव अभयारण्य, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-कहांडला अभयारण्य यांना जोडतो. त्यामुळे या परिसरातून वाघ, बिबट, अस्वल, सांबर, रानडुक्कर आणि इतर अनेक वन्यप्राणी नियमितपणे स्थलांतर करीत असतात. मात्र, महामार्गावर वन्यजीवांसाठी आवश्यक अंडरपास, ओव्हरपास, वेगनियंत्रण आणि इशारा व्यवस्था नसल्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. याच महामार्गावरील केसलाघाट परिसरात ऑक्टोबर 2025 मध्ये वाघिणीच्या पिल्लाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्यानंतरही वन्यजीवांसाठी कोणतीही प्रभावी उपशमन योजना राबविण्यात आलेली नाही.
 
 
दरम्यान, घटनास्थळी हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे, नाजिश अली, इमरान खान तसेच चिचपल्ली वनक्षेत्राचे वनरक्षक अनिल नालमवाड, वनमजूर विकास निकोडे, शंभू मडावी उपस्थित होते. या घटनेनंतर वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी चंद्रपूर-मूल महामार्गावर तातडीने उपशमन उपाययोजना राबविण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.