नागपूर,
citizens inconvenienced in the park भगवाननगर येथील कैकाडी महाराज उद्यानात तातडीने सुरक्षा रक्षक (गार्ड) नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. सुरक्षा रक्षक नसल्यामुळे उद्यानात मोकाट जनावरांचा वावर वाढला असून स्वच्छता आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्यानात मोकाट गायी, कुत्रे तसेच इतर जनावरे मोठ्या प्रमाणात येत असल्याने परिसरात घाण पसरत आहे. परिणामी, सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी, व्यायामासाठी तसेच मुलांना खेळण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना, विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सुरक्षा रक्षकाची नियुक्ती झाल्यास उद्यानाची स्वच्छता व सुरक्षितता राखण्यास मदत होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

उद्यानात नागरिकांच्या सोयीसाठी बाथरूमची सुविधा उपलब्ध असली, तरी सुरक्षा रक्षक नसल्याने त्या बाथरूमला कायम कुलूप लावण्यात येत आहे. त्यामुळे ही सुविधा नागरिकांसाठी निरुपयोगी ठरत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी हनुमाननगर झोनच्या सहाय्यक आयुक्तांकडे निवेदन सादर केले असून, उद्यानात कायमस्वरूपी अथवा पर्यायी सुरक्षा रक्षकाची तातडीने नियुक्ती करावी तसेच बाथरूमची सुविधा नियमितपणे नागरिकांसाठी खुली ठेवावी, अशी मागणी केली आहे. ही मागणी उद्यानात नियमित व्यायामासाठी येणाऱ्या महिला मंडळाच्या सदस्यांसह स्थानिक कार्यकर्त्या सुवर्णा चवरे, इंदू वासे आणि भगवाननगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र