छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या मागणीला गती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

    दिनांक :08-Jul-2026
Total Views |
हिंगणघाट,
Pratap Sarnaik शहरातील बसस्थानक परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, या मागणीला आता अधिक गती मिळाली असून मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
 

demand gains momentum for full size statue of chhatrapati sambhaji maharaj at hinganghat bus stand Pratap Sarnaik 
यापूर्वी सकल हिंदू समाज, विहिंप वर्धा जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करण्यात आले होते. छत्रपती संभाजी महाराज यांचे राष्ट्रासाठीचे अतुलनीय बलिदान, धर्मरक्षणासाठी केलेला संघर्ष आणि त्यांचे प्रेरणादायी कार्य लक्षात घेता हिंगणघाट बसस्थानक परिसरात त्यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली होती. या मागणीच्या अनुषंगाने मुंबई येथील मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी आमदार समीर कुणावार यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री सरनाईक यांच्याकडे विशेष पाठपुरावा करून हा नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय असून पुतळा उभारणीचा प्रस्ताव पुढील पंधरा दिवसात सादर करण्यात यावा, अशी विनंती केली. या मागणीची दखल घेत प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक कारवाई करण्याबाबत सहमती दर्शविली.
निवेदन देताना विहिंपचे जिल्हा मंत्री शरद कोणप्रतिवार, विशेष संपर्क प्रमुख गजानन मसाये, विद्या विकास संस्थेचे अध्यक्ष उमेश तुळसकर, नगरसेवक बंटी वाघमारे, सुनील राऊत, मनोज जुमडे उपस्थित होते.
हिंगणघाट बसस्थानक हे शहरातील प्रमुख आणि वर्दळीचे ठिकाण असल्याने या परिसरात महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारल्यास नागरिक, विद्यार्थी आणि प्रवाशांना इतिहासाची सातत्याने प्रेरणा मिळेल, असेही निवेदनात म्हटले आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करणारा हा पुतळा हिंगणघाटच्या वैभवात भर घालणारा ठरेल, तसेच भावी पिढ्यांना राष्ट्रनिष्ठा, धर्मनिष्ठा आणि स्वाभिमानाचा संदेश देणारे प्रेरणास्थान बनेल, असा विश्वास सकल हिंदू समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. शासनाने या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून पुतळा उभारणीचे काम तात्काळ सुरू करावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.