मुंबई
deool band 2 प्रवीण तरडे लिखित, दिग्दर्शित आणि अभिनीत ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवत मराठी चित्रपटसृष्टीत नवा विक्रम नोंदवला आहे. रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’नंतर १०० कोटी रुपयांची कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरला आहे. २१ मे २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला असून, इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनीही चित्रपटाचे आणि प्रवीण तरडे यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
चित्रपटाच्या यशानंतर प्रवीण तरडे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्याशी संबंधित एक खास प्रसंग सांगितला. ‘देऊळ बंद 2’ यशस्वी झाल्यानंतर सर्वांत आधी नाना पाटेकर यांचा फोन आला होता आणि त्यांच्या एका कृतीमुळे आपल्याला मोठी प्रेरणा मिळाल्याचे तरडे यांनी सांगितले. प्रवीण तरडे म्हणाले, “देऊळ बंद 2 यशस्वी झाल्यानंतर मला सर्वांत आधी नाना पाटेकर यांचा फोन आला होता. नीलकांती पाटेकर या त्यांच्या शेतात आणि गावात काम करणाऱ्या २४ ते २६ महिलांना घेऊन थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी स्वतः त्या सर्वांची तिकिटं काढली होती. त्यामुळे मी नाना आणि नीलकांती पाटेकर यांचा खूप आभारी आहे. त्यांचा फोन आल्यानंतर मला खरी उभारी मिळाली.”
मोहन जोशी, स्नेहल तरडे, deool band 2 प्रवीण तरडे, महेश मांजरेकर यांच्यासह अनेक कलाकारांच्या दमदार अभिनयाने सजलेला ‘देऊळ बंद 2’ हा सध्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. प्रदर्शनाच्या ३९व्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा पार केला. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे बजेट केवळ १० कोटी रुपये इतके होते.‘देऊळ बंद 2’मध्ये शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, निकृष्ट दर्जाचे बी-बियाणे, बनावट खते, कीटकनाशके आणि सरकारी यंत्रणेकडून होणारा त्रास अशा अनेक वास्तववादी विषयांवर भाष्य करण्यात आले आहे. चित्रपटात प्रवीण तरडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी महिला शेतकऱ्याची प्रमुख भूमिका साकारली आहे. तर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी पुन्हा एकदा स्वामी समर्थांची भूमिका साकारली आहे.