नागपूर,
musical concert स्वरसाधना, लोकतंत्र सेनानी संघ आणि ज्येष्ठ नागरिक महामंडळ, विदर्भ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मंगेशकरांची गाणी : दिनानाथ ते हृदयनाथ’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मास्टर दीनानाथ मंगेशकर ते पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यापर्यंतच्या संगीत परंपरेतील अजरामर गीतांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवयित्री सुचित्रा कातरकर यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर रचलेल्या निवडक गीतांचाही कार्यक्रमात समावेश आहे.
कार्यक्रमाला माजी आमदार अनिल सोले आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णरेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. श्याम देशपांडे, रसिका करमाळेकर, सुचित्रा कातरकर, आशिष घाटे, विजय देशपांडे, छाया वानखेडे, प्रा. पद्मजा सिन्हा, अश्विनी लुले, आकांक्षा चारभाई आणि आर्या देशपांडे हे गायक-गायिका मास्टर दीनानाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, मीना खडीकर, उषा मंगेशकर आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी अजरामर केलेल्या गीतांचे सादरीकरण करणार आहेत.
गायनाला आनंद मास्टे (सिंथेसायझर), मोरेश्वर दशसहस्त्र आणि आशिष घाटे (तबला), तसेच विक्रम जोशी (तालवाद्य) साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन प्रा. उज्ज्वला अंधारे करणार आहेत. या सुरेल मैफलीचा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सौजन्य: वर्षा किडे कुळकर्णी, संपर्क मित्र