‘दृश्यम’ फेम गायतोंडेचे 70 लाख रुपये बुडाले

    दिनांक :08-Jul-2026
Total Views |
मुंबई
kamlesh sawan ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’ या चित्रपटांमधील गायतोंडे या भूमिकेमुळे अभिनेता कमलेश सावंत यांना मोठी लोकप्रियता मिळाली. पडद्यावर अजय देवगण आणि त्याच्या कुटुंबीयांना त्रास देणाऱ्या गायतोंडेची भूमिका त्यांनी इतक्या प्रभावीपणे साकारली की, आजही त्या व्यक्तिरेखेबद्दल प्रेक्षकांमध्ये तीव्र भावना आहेत. मात्र, खऱ्या आयुष्यात कमलेश सावंत यांनाच मोठ्या आर्थिक फसवणुकीचा सामना करावा लागल्याचा खुलासा त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. आतापर्यंत तब्बल ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
drishyam actor kamlesh sawant reveals rs 70 lakh financial loss due to fraud
कमलेश सावंत म्हणाले, “मी पडद्यावर कितीही नकारात्मक भूमिका साकारल्या तरी खऱ्या आयुष्यात मी कुणालाही त्रास देत नाही. माझे पैसे परत द्या, असा तगादाही मी कुणाला लावत नाही. यामुळे आतापर्यंत माझं किमान ७० लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. माझे इतके पैसे बुडाले आहेत. ते पैसे बुडाले नसते तर माझ्यावर आता घराचं कर्ज नसतं. पण ते पैसे माझे नव्हते, असं मी समजतो. एक-दोन वेळा फोन करून झाल्यावर तिसऱ्यांदा मी सांगतो की, पैसे द्यायचे असतील द्या, नाहीतर जाऊ द्या.”
 
 
याच मुलाखतीत त्यांनी केशु रामसे यांच्या ‘फॅमिली’ चित्रपटाशी संबंधित एक अनुभवही सांगितला. या चित्रपटात काम केल्यानंतर २००६ मध्ये त्यांचे ७५ हजार रुपयांचे अंतिम मानधन बाकी होते. आर्थिक अडचणींमुळे केशु रामसे अनेकांचे पैसे देऊ शकले नव्हते. त्यानंतर चार वर्षांपूर्वी त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने कमलेश सावंत यांना फोन करून, “सर, तुमचे किती पैसे बाकी आहेत, सांगाल का? बाबांच्या निधनानंतर आम्ही सगळ्यांचे थकीत पैसे परत करत आहोत,” असे सांगितले.
त्यावर कमलेश kamlesh sawan  सावंत यांनी त्या व्यक्तीला स्पष्ट उत्तर दिले. “तू कोण आहेस, मी तुला ओळखत नाही. तुझ्यासोबत माझा कोणताही पैशांचा व्यवहार झालेला नाही. माझा व्यवहार तुझ्या वडिलांसोबत झाला होता. ते गेले, तसे माझे पैसेही गेले. विषय संपला,” असे ते म्हणाले.
वडिलांचे कर्ज मुलाने फेडावे, या विचारांचा आपण नसल्याचेही कमलेश सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले. हा स्वभाव कदाचित आपल्या वडिलांकडूनच मिळाला असावा, असेही त्यांनी नमूद केले.