बारुईपूर,
Encounter of rape-murder accused पश्चिम बंगालमधील बारुईपूर येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप असलेला प्रभास मंडल पोलीस चकमकीत ठार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची पुनर्रचना करण्यासाठी मंगळवारी मध्यरात्री सुमारे १२.४५ वाजता आरोपीला घटनास्थळी नेण्यात आले होते. यावेळी त्याने पोलिसांचे शस्त्र हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलीस पथकावर गोळीबार केल्याचा आरोप असून, आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. त्यामध्ये प्रभास मंडल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण गुन्ह्याची पुनर्रचना करण्यासाठी आरोपीला घटनास्थळी आणण्यात आले होते. त्यावेळी घडलेल्या घटनांमुळे ही चकमक झाली. प्रभास मंडल हा या प्रकरणातील प्रमुख संशयितांपैकी एक होता. तपासादरम्यान मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार आणि हत्येपूर्वी दिसून आला होता. रविवारी दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूरच्या सूर्यपूर हाट परिसरात एका पोत्यामध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली. नागरिकांनी बारुईपूर-जयनगर मार्गावर रास्ता रोको करत टायर जाळले, अनेक वाहनांची तोडफोड केली आणि आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. या आंदोलनादरम्यान संतप्त जमावाने या गुन्ह्यात सहभागी असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला मारहाण करून ठार केल्याची घटनाही घडली.
या प्रकरणानंतर राज्य सरकारने तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. तसेच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मंगळवारी बारुईपूर येथे जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, आरोपी प्रभास मंडलच्या आईने आपल्या मुलाचा मृतदेह स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. पोलिसांनी मृत्यूची माहिती दिल्यानंतर तिने, "मला आता त्याला पाहायचेही नाही. त्याने जे कृत्य केले त्याची त्याला शिक्षा मिळाली आहे. एक आई म्हणून मला दुःख आहे, पण त्याने माझे कधीच ऐकले नाही. तो दिवसभर दारूच्या नशेत असायचा. आता मला याबाबत आणखी काही बोलायचे नाही," अशी प्रतिक्रिया दिली. तिच्या या वक्तव्याची सध्या मोठी चर्चा सुरू आहे.