नवी दिल्ली,
final flight test of CE-20 engine भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने आपल्या अंतराळ मोहिमांच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. इस्रोच्या सर्वात शक्तिशाली प्रक्षेपण यान एलव्हीएम-३च्या सातव्या ऑपरेशनल मोहिमेसाठी वापरल्या जाणाऱ्या CE-20 क्रायोजेनिक इंजिनची अंतिम उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. या चाचणीमुळे इंजिन प्रत्यक्ष प्रक्षेपणाच्या परिस्थितीत अपेक्षित कामगिरी करते का, याची खात्री करण्यात आली. ही अंतिम चाचणी तामिळनाडूतील महेंद्रगिरी येथील इस्रो पल्शन कॉम्प्लेक्समध्ये पार पडली. पूर्वी जीएसएलव्ही एमके-३ या नावाने ओळखले जाणारे एलव्हीएम-३ हे इस्रोचे सर्वात जड आणि सर्वाधिक क्षमतेचे प्रक्षेपण यान असून, त्याच्या वरच्या टप्प्याला आवश्यक शक्ती CE-20 क्रायोजेनिक इंजिन पुरवते.
प्रक्षेपणापूर्वी इंजिनची प्रत्यक्ष उड्डाणासारख्या परिस्थितीत चाचणी घेणे ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते. यामुळे उड्डाणादरम्यान इंजिनची कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि विविध प्रणालींचे समन्वय तपासले जातात. इस्रोच्या माहितीनुसार, या अंतिम चाचणीत इंजिनच्या सर्व प्रणालींची कामगिरी पूर्णपणे समाधानकारक आढळली. CE-20 इंजिन हे १९ ते २२ टन थ्रस्ट निर्माण करण्यासाठी प्रमाणित करण्यात आले आहे. या इंजिनने आतापर्यंत झालेल्या एलव्हीएम-३च्या सलग आठ यशस्वी मोहिमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. यामध्ये चांद्रयान-२, चांद्रयान-३ तसेच तीन व्यावसायिक अंतराळ मोहिमांचा समावेश आहे.
इस्रोने स्पष्ट केले की, हेच इंजिन गगनयान मानवी अंतराळ मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा आणि विश्वासार्हतेच्या सर्व निकषांवर यशस्वीपणे उतरले आहे. नुकत्याच झालेल्या अंतिम उड्डाण चाचणीत इंजिनची २२ टन थ्रस्टवर यशस्वी चाचणी घेण्यात आली. विशेष म्हणजे, या वेळी प्रथमच नोझल प्रोटेक्शन सिस्टम (NPS)चा वापर करण्यात आला. NPS हे तंत्रज्ञान इंजिनच्या नोझलचे संरक्षण करण्यासाठी विकसित करण्यात आले असून, विशेषतः उच्च उंचीच्या परिस्थितीत चाचण्या अधिक सुलभ आणि कार्यक्षम बनवते. या प्रणालीमुळे कमी संसाधनांमध्ये अधिक प्रभावी चाचण्या घेणे शक्य होते आणि चाचणीचा कालावधीही वाढवता येतो. इस्रोने सांगितले की, या चाचणीत इंजिनच्या सर्व प्रणालींसह NPSनेही अपेक्षेप्रमाणे उत्कृष्ट कामगिरी केली असून, भविष्यातील एलव्हीएम-३ आणि गगनयानसारख्या महत्त्वाच्या मोहिमांसाठी हे यश अत्यंत मोलाचे ठरणार आहे.