सातारा,
Four killed in Satara सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. खामगाव येथे घरासमोरील विद्युत केबलच्या तारेला स्पर्श झाल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. फलटण तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी पहाटे ही घटना घडली. खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळ राहणारे शिंदे कुटुंब नेहमीप्रमाणे सकाळी उठून घराबाहेर आले होते. यावेळी सकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घराबाहेरील विद्युत तारेला अचानक वीज प्रवाह उतरला.

या वेळी पिसुरड्या किसन शिंदे (वय ४८) यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यांना वाचवण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांनी तातडीने धाव घेतली. मात्र, त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात गंगुबाई पिसुरड्या शिंदे (वय ४६), सचिन पिसुरड्या शिंदे (वय २६) आणि आरती पिसुरड्या शिंदे (वय २२) हे तिघेही विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आले.विद्युत प्रवाहाची तीव्रता अधिक असल्याने काही क्षणांतच चौघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेत दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. ही दुर्घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, याचा तपास फलटण पोलिसांकडून सुरू आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे खामगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.