नागपूर,
vatsalya play school शिक्षणासाठी आर्थिक अडचण कधीही अडथळा ठरू नये आणि प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची समान संधी मिळावी या उद्देशाने पिपळा फाटा येथील वात्सल्य प्ले स्कूलतर्फे निशुल्क वह्या वाटपाचा उपक्रम गेल्या चार वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत आहे. यंदाही या परंपरेला कायम ठेवत २५ शाळांतील ७५ गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक डझन वह्यांचे वितरण करण्यात आले.
रविवार, ५ जुलै २०२६ रोजी वात्सल्य प्ले स्कूल, पिपळा फाटा येथे गुरुभक्त सेवा समिती, नागपूर आणि वात्सल्य प्रकृती बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमामुळे हुडकेश्वर आणि पिपळा परिसरातील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक साहित्याची मदत मिळाली.
कार्यक्रमाला बेसा नगराध्यक्षा श्रीमती कीर्ती बडोले प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच गुरुभक्त सेवा समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी संचेती, सचिव श्रीमती भावना मानावत, कोषाध्यक्ष श्री संजयजी पगारिया, उपाध्यक्ष श्री महेंद्रजी लोढा, प्रोजेक्ट डायरेक्टर श्री प्रणयजी पगारिया, संरक्षक श्री शैलेंद्रजी मानावत, वात्सल्य प्रकृती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती वंदना कापसे आणि सचिव श्री प्रकाश कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्रीमती कीर्ती बडोले यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन केले. गुरुभक्त सेवा समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी संचेती यांनी संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. तर श्री प्रकाश कापसे यांनी प्रास्ताविकातून दरवर्षी निशुल्क वह्या वाटप करण्यामागील सामाजिक उद्देश स्पष्ट केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वात्सल्य प्ले स्कूलच्या शिक्षिका श्रीमती चेतना शेंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती परिहार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती वैशाली एलकेवार तसेच इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.