गोंदिया,
gondia-municipal-council-school : भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. यात शासकीय शाळांतील शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांवर दुहेरी जबाबदारी आली असून त्याचा थेट फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. कामाचा ताण वाढल्याने काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दुपारीच सुट्टी दिली जात आहे. शहरातील रामनगर येथील नगर परिषदेच्या म्युनिसिपल हायस्कूलमध्ये बुधवारी 8 जुलै रोजी असेच चित्र दिसून आले असून येथील शिक्षकांनी दुपारी अडीच वाजताच शाळेला सुट्टी देत एसआयआरच्या कामावर गेल्याने वर्गखोल्यांना दुपारीच कुलूप लागल्याचे दिसून आले.

शैक्षणिक सत्र सुरू असतानाच शिक्षकांना एसआयआरचे काम सोपविण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. असे असले तरी 30 जुलैपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याने शिक्षकांना अध्यापनासोबतच मतदार पुनरीक्षणाचे काम करावे लागत आहे. परिणामी अनेक शिक्षक शाळेची वेळ संपण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना सुटी देऊन एसआयआरचे काम करण्यासाठी शाळा सोडत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या नियमित अध्यापनात व्यत्यय येत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची चिंता पालकांकडून व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या कमतरतेमुळे नगर परिषदेच्या शाळांचे अस्तित्व आधीच संकटात आले आहे. असे असताना, अशा प्रकारे अर्धा दिवसच अध्यापन होत असल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुधवारी दुपारी रामनगर येथील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना दुपारी अडीच वाजताच सुटी देण्यात आल्याचे दिसून आले. याबाबत विचारणा केली असता, एसआयआरच्या कामामुळे शिक्षकांना बाहेर जावे लागत असल्याने वेळेपूर्वी सुटी दिली जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र सर्व प्रकारात गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
शैक्षणिक नुकसान करणे हेतू नाही...
इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत सुमारे 150 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेत सात शिक्षक कार्यरत असून त्यापैकी पाच शिक्षकांवर बीएलओची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेपूर्वी सुटी द्यावी लागत आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणे हा आमचा उद्देश नाही.
- अजय भिवगडे, मुख्याध्यापक, म्युनिसिपल हायस्कूल, रामनगर