गुजरातमध्ये अतिवृष्टीचा फटका; महामार्ग खचले, गाड्या रद्द!

    दिनांक :08-Jul-2026
Total Views |
सुरत,
Gujarat hit by heavy rainfall गुजरातसह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सुरतमध्ये अवघ्या ३६ तासांत १८ इंच पावसाची नोंद झाली असून, जुलै १९४१ मधील १८ इंच पावसाचा तब्बल ८५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. शहरातील अनेक भाग जलमय झाले असून, फ्लायओव्हरवरही पाणी साचले आहे. एका शॉपिंग मॉलचा एक मजला पाण्याखाली गेला असून, अनेक रस्त्यांवर वाहने पाण्यात तरंगताना दिसत आहेत. विजेचा धक्का, झाडे कोसळणे आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे. पूरग्रस्त भागातून ३,४०० नागरिकांची सुटका करण्यात आली असून, सुरत आणि जवळच्या नवसारी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
 
 
 

gijarat 
 
मध्य प्रदेशातील जबलपूर येथे मंगळवारी सायंकाळी पाच मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. तर राजस्थानातील जालोर येथे नदीत जीप उलटल्याची घटना समोर आली. चित्तोडगड येथे वीज पडून एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान, मुसळधार पावसामुळे दिल्ली-जयपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ खचल्याने सुमारे १० किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. एका शाळेची बस नाल्यात अडकली, तर गुरुग्राममधील अनेक भागांत दोन फूटांपर्यंत पाणी साचले आहे. परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी कंपन्यांना पुढील काही दिवस कर्मचाऱ्यांना घरून काम (WFH) करण्याची परवानगी देण्याचे आवाहन केले आहे.
 
 
 
 
 
अरुणाचल प्रदेशातील २६ जिल्ह्यांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे ९४ हजारांहून अधिक नागरिक प्रभावित झाले आहेत. या आपत्तीत चार जणांचा मृत्यू, २१ जण जखमी, तर दोन महिला बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात १ जुलैपासून पावसाशी संबंधित घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी गेल्या २४ तासांत तीन जणांचा बळी गेला आहे. प्रशासनाने ३८९ कुटुंबांतील १,२६१ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवून मदत शिबिरांमध्ये दाखल केले आहे. पावसामुळे दोन सिमेंटची आणि चार कच्ची घरे पूर्णपणे कोसळली, तर ७३ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. दुसरीकडे, केरळच्या वायनाड जिल्ह्यात बोगद्याच्या रस्त्याच्या बांधकामस्थळी झालेल्या भूस्खलनानंतर दुसऱ्या दिवशीही बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. बचाव पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेत आहेत.