जम्मू,
Lashkar-e-Taiba commander Zakir Ghani killed. जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहशतवादाविरोधातील मोहिमेत मोठे यश मिळवत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर झाकीर घनी याला ठार केले. सलग चार दिवस सुरू असलेल्या शोधमोहीमेचा बुधवारी यशस्वी शेवट झाला. या कारवाईनंतर दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, घटनास्थळावरून शस्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियानच्या चानपोरा परिसरात शनिवारी पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली होती. मोहिमेदरम्यान बुधवारी एका गोठ्यात झाकीर घनीचा मृतदेह आढळून आला. सुरक्षा दलांनी परिसराची झडती घेत घटनास्थळ सुरक्षित केले.
तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शोधमोहीम सुरू असताना जवानांना संशयास्पद हालचाली आणि गोळीबाराचा आवाज ऐकू आला. त्यानंतर सुरक्षा दलांनी तात्काळ प्रत्युत्तर देत कारवाई केली. काही काळ दोन्ही बाजूंमध्ये गोळीबार झाला आणि त्यात झाकीर घनी ठार झाला. या का रवाईबाबत जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावर प्रतिक्रिया देताना, "तुम्ही पळून जाऊ शकता, पण लपू शकत नाही," असा संदेश देत ही मोहीम यशस्वी झाल्याचे जाहीर केले. पोलिसांनी सांगितले की, एसओजी शोपियान, ५५ राष्ट्रीय रायफल्स (RR) आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त कारवाईत लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.
सुरक्षा यंत्रणांच्या मते, झाकीर घनीचा खात्मा हा दहशतवादविरोधी कारवाईतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. मात्र त्याच्यासोबत असलेला लष्कर-ए-तोयबाचा दुसरा दहशतवादी लतीफ अद्याप फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी परिसरात व्यापक शोधमोहीम सुरू आहे. सुरक्षा दलांकडून संपूर्ण भागाची कसून तपासणी करण्यात येत असून, अन्य दहशतवादी लपून बसलेले नाहीत ना, याचीही खात्री केली जात आहे.