अनिल कांबळे,
नागपूर,
loan-app-fraud : कर्ज मिळविण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या गरजूंना सायबर गुन्हेगारांकडून ‘मस्त मनी’ लोन ॲप डाऊनलोड केल्यानंतर कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते होते. त्या कर्जाच्या वसुलीसाठी सायबर गुन्हेगार खंडणी वसुली करीत होते. उच्चशिक्षित असलेल्या सायबर गुन्हेगाराच्या टोळीने देशभरातील लाखो नागरिकांना २३४ कोटी रुपयांनी फसवले. या टोळीचा मुख्य सूत्रधार नागपूर पोलिसांनी अटक केली असून त्याच्या अन्य तीन साथिदारांचा शोध सुरु आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त दीपक अग्रवाल यांनी दिली. कामिल सिद्धीकी हामीद सिद्धीकी (३१, काझीपुरा, बेरसिया-भोपाळ, मध्यप्रदेश) असे मुख्य आरोपीचे नाव आहे.

संगणक विषयात (एमसीए) पदव्युत्तर असलेल्या कामिल याला सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाची माहिती आहे. त्याने ‘मस्त मनी’ हे मोबाईल ॲप्लिकेशन तयार केले आहे. अल्प मुदतीसाठी कर्ज मिळविण्याच्या नादात गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध मस्त मनी ॲपला आतापर्यंत ५ लाख ३२ हजार जणांनी मोबाईलमध्ये डाऊनलोड केले. त्यापैकी २ लाख ३४ हजार जणांकडून या टोळीने वेगवेगळ्या माध्यमातून २३४ कोटी रुपयांची सायबर खंडणी वसुल केली आहे. त्यांच्यासाठी कामिल सिद्धीकी या सॉफ्टवेअर डेव्हलपरने मस्त मनी ॲपमध्ये एपीके फाईल ऑटोअपलोड मोडवर ठेवली. ॲप डाऊनलोड करताच ती एपीके फाईलही मोबाईलमध्ये डाऊनलोड होत होती. त्यानंतर मोबाईलचा ताबा कामिल सिद्धीकीकडे येत होता.
खंडणीसाठी अश्लिल फोटो करायचे व्हायरल
‘मस्त मनी’ ॲप्लिकेशन डाऊनलोड करताच मोबाईलचा ताबा सायबर गुन्हेगाराकडे जात होता. मोबाईलची फोटो गॅलरीचा ताबासुद्धा गुन्हेगारांकडे जात होता. सायबर गुन्हेगारा हे २० ते ५० हजार रुपये कर्ज देत होते. मात्र, त्या कर्जाची पाच ते दहा पट वसुली करीत होते. त्यानंतर ग्राहकांच्या मोबाईलमधील गॅलरीतील फोटो मिळवून फोटोचे मॉर्फिंग करून नग्न फोटो किंवा अश्लील व्हिडिओ बनवून सोशल मिडियावर आणि नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग करत होते. गुन्हेगारांनी आतापर्यंत २ लाख ३४ हजार ग्राहकाकडून २३४ कोटी खंडणी वसुल केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले.
असा झाला गुन्ह्याचा उलगडा….
सायबर पोलिस ठाण्यात स्विटी या २१ वर्षीय तरुणीने फसवणुकीची तक्रार केली. त्याचा शोध घेताना सायबर शाखेला मस्त मनी ॲपवर संशय आला. पोलिसांनी कामिल सिद्दिकी नावाच्या डेव्हलपरचा माग काढत त्याला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार चार टप्प्यात ही टोळी काम करते. यासाठी टोळीतील एक जण अल्पमुदतीसीठी कर्ज देतो, दुसरा त्याची वसुली करतो, तिसरा एपीके फाईलमधील फोटो माॉर्फ करून खंडणीसाठी धमक्या देणारे फोन करतो. धक्कादायक बाब म्हणजे या टोळीतील आणखी तिघे देखील उच्चशिक्षित आहेत. या टोळीने देशभरातील लाखो ग्राहकांची कोट्यवधीने फसवणूक केली आहे.