‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स’वरून वाद पेटला

रुपाली चाकणकरांची २५ कोटींची नोटीस, दीपाली सय्यद म्हणाल्या ‘कोर्टात उत्तर देऊ’

    दिनांक :08-Jul-2026
Total Views |
मुंबई
deepali sayyed नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. अशोक खरात याला अटक झाल्यानंतर त्याच्याशी संबंधित अनेक गंभीर बाबी समोर आल्या. आता याच प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. मात्र, या चित्रपटावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे.
 
 

maharashtra epstein files controversy rupali chakankar sends rs 25 crore notice to deepali sayyed 
या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद या रुपाली चाकणकर यांच्यावर आधारित पात्र साकारणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या चित्रपटाला रुपाली चाकणकर यांनी विरोध केला आहे. संबंधित प्रकरण न्यायालयात सुरू असताना अशा प्रकारे चित्रपट प्रदर्शित करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांच्या वतीने चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांना २५ कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीची नोटीस पाठवण्यात आली आहे.
 
या नोटीसीनंतर अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. “आमच्यावर २५ कोटींचा दावा टाकण्यात आला आहे. ज्यांनी हा दावा केला, त्यांच्यावर आम्हाला हसू येत आहे. कारण हा चित्रपट आत्मचरित्र नाही. या चित्रपटामध्ये कुठल्याही व्यक्तीच्या नावाचा वापर केलेला नाही. चित्रपट करत असताना आमच्यावर कोणत्याही प्रकारची रोकठोक होत असेल तर ते चुकीचे आहे,” असे दीपाली सय्यद यांनी म्हटले.यावेळी त्यांनी या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करत, “हा चित्रपट बनू नये यासाठी deepali sayyed  तुम्ही जे केलं ते खरं आहे का?” असा सवालही केला. या प्रकरणात जे काही असेल त्याला न्यायालयात उत्तर देऊ, असेही दीपाली सय्यद यांनी स्पष्ट केले.दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. “रुपाली चाकणकर यांची २५ कोटींची नोटीस आली आहे. आम्ही कुणाची अब्रू घालवण्यासाठी हा चित्रपट करत नाही. महिला अत्याचार आणि भोंदूगिरीच्या विरोधात आमचा हा चित्रपट आहे,” असे त्यांनी सांगितले.तसेच ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स’ हा चित्रपट २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणारच असल्याचे स्वरूप सावंत यांनी स्पष्ट केले आहे. आता या वादावर रुपाली चाकणकर यांची पुढील प्रतिक्रिया काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.