अधिवेशनात शेतकरी, रेल्वे, सिंचन, रस्ते व पायाभूत सुविधांवर ठोस मागण्या

आ. संजय गायकवाड यांचा अधिवेशनात पाठपुरावा

    दिनांक :08-Jul-2026
Total Views |
बुलढाणा,
mla sanjay gaikwad विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आ. संजय गायकवाड यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न सभागृहात प्रभावीपणे उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले. शेती, सिंचन, रस्ते, रेल्वे, वाहतूक, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच प्रशासकीय पायाभूत सुविधांबाबत त्यांनी दि. ८ जुलै रोजी सभागृहात अभ्यासपूर्ण भूमिका मांडली.
 
 
mla sanjay gaikwad
 
सभागृहात बोलताना त्यांनी सांगितले की, राज्यातील शेतकर्‍यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढवायचे असेल तर आधुनिक जनुकीय तंत्रज्ञानाच्या वापरातील अनावश्यक अडथळे दूर करणे आवश्यक आहे. आधुनिक शेतीला चालना देतानाच शेतकर्‍यांना त्यांच्या कृषी मालाच्या विक्रीचे अधिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान बंधनांमध्ये आवश्यक सुधारणा करून शेतकर्‍यांना मुक्त बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
बुलढाणा—चिखली मार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सांगितले की, या रस्त्याच्या कामासमोरील प्रशासकीय आणि आर्थिक अडथळे तातडीने दूर करून कामाला गती देण्यात यावी. तसेच बुलढाणा शहराचा बाह्यवळण रस्ता आणि राजूर घाटातील एकेरी वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. खामगाव—बोथा मार्गावरील वनक्षेत्रामुळे रात्रीच्या वाहतुकीवर येणार्‍या अडचणींचाही त्यांनी सभागृहात उल्लेख केला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा मार्ग सुरक्षित आणि अखंड सुरू ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी सूचना त्यांनी शासनाला केली. बुलढाणा जिल्हा आजही रेल्वे कनेटिव्हिटीपासून वंचित असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी मलकापूर—मोताळा—बुलढाणा—चिखली असा सुमारे १२५ किलोमीटरचा नवीन रेल्वेमार्ग मंजूर करण्याची जोरदार मागणी केली. या रेल्वेमार्गामुळे उद्योग, व्यापार, शिक्षण, पर्यटन, रोजगार आणि दळणवळणाला मोठी चालना मिळेल तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असे त्यांनी सभागृहात नमूद केले. याचबरोबर त्यांनी वैनगंगा—नळगंगा नदीजोड प्रकल्पाची व्याप्ती वाढवून मोताळा आणि बुलढाणा तालुयालाही लाभ देण्याची मागणी केली. मोताळा तालुका हा राज्यातील अवर्षणग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त तालुयांपैकी एक असून, या प्रकल्पाचा विस्तार झाल्यास सुमारे दीड लाख हेटर क्षेत्र सिंचनाखाली येईल आणि हजारो शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
तसेच बुलढाणा व मोताळा पंचायत समितीच्या शंभर वर्षांपूर्वीच्या जुन्या इमारतींच्या जागी आधुनिक प्रशासकीय इमारती उभारण्यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली. सभागृहातील चर्चेदरम्यान त्यांनी लोकशाही परंपरा आणि सभागृहाची प्रतिष्ठा जपणार्‍या अध्यक्षांचे आभार मानत, बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असलेले प्रत्येक प्रश्न सातत्याने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने सभागृहात मांडत राहणार असल्याची ग्वाही दिली. शेतकरी, युवक, सर्वसामान्य नागरिक आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी संघर्ष करणे हेच आपले कर्तव्य असून, जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आवश्यक प्रत्येक प्रश्न शासन दरबारी ठामपणे मांडत राहू, असा निर्धार आ. संजय गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला.