गोंदिया,
my-village-healthy-village-campaign : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आयुष्मान भारत - समग्र प्राथमिक आरोग्य सेवा अंतर्गत राज्यातील प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी व ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाला गती देण्यासाठी दोन दिवसीय उजळणी प्रशिक्षण शिबिरांचे राज्यव्यापी आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने राज्यातील पाच हजारांवर अधिकारी व कर्मचार्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या प्रशिक्षणामुळे प्राथमिक आरोग्य सेवा बळकट होणार असताना प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न गाव बनविण्याच्या उद्दिष्टपूर्तीस हातभार लागणार आहे.

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागांतर्गत राज्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आशा पर्यवेक्षक आणि आशा स्वयंसेविका अशा प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावरील सर्व कर्मचार्यांना सहभागी करून घेतले जात आहे. प्राथमिक आरोग्य सेवा अधिक परिणामकारक, अद्ययावत आणि रुग्णकेंद्रित करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि प्रत्यक्ष कामकाजातील सुधारणा या प्रशिक्षणातून दिल्या जात आहेत. दरम्यान, राज्यात 116 प्रशिक्षण बॅचेस यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून 5 हजार 10 अधिकारी व कर्मचार्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. प्रत्येक जिल्ह्यातून 10 प्रशिक्षकांची निवड करून त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणाची गुणवत्ता, एकसमानता आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी अनुभवी मेंटर्स तसेच जिल्हास्तरीय नोडल अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
केवळ व्याख्यान नाही तर प्रात्याक्षिक...
प्रशिक्षण केवळ वर्गातील व्याख्यानापुरते मर्यादित नसून प्रात्यक्षिकांवर आधारित अध्यापन आणि समुदाय सहभागावर आधारित प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जात आहे. यात प्रत्यक्ष गृहभेटी, नागरिकांशी आरोग्य संवाद, कुटुंबांना आरोग्यविषयक मार्गदर्शन, आजारांचे लवकर निदान, जोखीम असलेल्या व्यक्तींची ओळख आणि आवश्यकतेनुसार संदर्भसेवा आदी प्रत्यक्ष अनुभव दिला जात आहे.
गोंदिया जिल्ह्यात अडीच हजार अधिकारी-कर्मचार्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार असून प्रत्येक प्राथमीक आरोग्य केंद्र स्तरावर दोन दिवसाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात आतापर्यंत जिल्ह्यातील दिडशे अधिकारी व कर्मचार्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.
- अभिजीत गोल्हार, जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया