नागपूर,
deepti-verma : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागातील विद्यार्थिनी दीप्ती वर्मा हिची भारतातील प्रतिष्ठित आयआयटी बनारस हिंदू विद्यापीठातील प्री-डॉक्टरल फेलोशिपसाठी निवड झाली आहे. ती 'भविष्यकालीन प्रतिजैविक औषधांच्या शोधासाठी बहुआयामी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली' या महत्त्वपूर्ण संशोधनावर काम करणार असून, विद्यापीठासाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.
- एआयच्या साहाय्याने प्रतिजैविकांचा शोध
प्रतिजैविकांप्रती वाढणारा प्रतिकार आणि बदलती जनुकीय रचना लक्षात घेता, पुढील पिढीतील प्रभावी प्रतिजैविकांचा शोध घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर महत्त्वाचा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर दीप्ती वर्मा आयआयटी-बीएचयूमध्ये डॉ. रजनीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एक वर्षाच्या फेलोशिपदरम्यान बहुआयामी एआय प्रणाली विकसित करण्यासंबंधी संशोधन करणार आहे.
सध्या दीप्ती वर्मा या डॉ. प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एम. फार्म.चे शिक्षण घेत आहेत. एनपीटीईएलच्या राष्ट्रीय ऑनलाइन अभ्यासक्रमात 'कृत्रिम बुद्धिमत्तेतून औषध शोध आणि विकास' या विषयात तिने प्राविण्य मिळवले. त्याआधारे तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत तिला ही प्रतिष्ठेची फेलोशिप मिळाली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून या राष्ट्रीय स्तरावरील प्री-डॉक्टरल फेलोशिपसाठी निवड होणारी ती पहिली विद्यार्थिनी ठरली आहे.
दीप्ती वर्मा यांच्या या यशाबद्दल कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खंडाळ, आयक्यूएसी संचालक डॉ. नंदकिशोर करडे, एनपीटीईएल समन्वयक डॉ. विजय तांगडे, विभागप्रमुख डॉ. राजेंद्र काकडे तसेच मार्गदर्शक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी अभिनंदन करून पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या.