स्वार्थापुढे ‘झाडे’ही बदनाम!

    दिनांक :08-Jul-2026
Total Views |
वेध
 
विजय निचकवडे
 
oxygen producing trees पाळेमुळे पिढीवर होणाऱ्या संस्काराची असोत की तुमचा-आमचा श्वास चालू ठेवण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू देणाऱ्या वृक्षांची. जोपर्यंत ती खोलवर रुजत नाही, त्याला पोषण मिळत नाही, तोवर ती पिढी वा वृक्ष दुबळे आणि खिळखिळीचं! कमकुवत पिढीचा अनुभव आपण ‘लोहगडा’वर घेतला तर दुबळ्या झाडांचा मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी. झाडं पडली, लोकांचे जीव गेले आणि आम्ही त्यांना दोषी ठरवून मोकळे झालो. नि:स्वार्थ भावाने उभी असलेली झाडे ‘धोकादायक’ ठरली. भौतिक सुविधांच्या नादात आम्ही स्वार्थी झालो. आमच्या चुकांचे खापर निष्पाप झाडांवर फुटू लागले आणि त्यांनाही बदनाम करण्यात कोणतीच कसर आम्ही सोडली नाही.
 

vrukshtod 
 
आतापर्यंत वाहिन्यांवर रोजच्या चर्चेत येणारे एक नाव आपण जाणतोच! होय, त्याची सवयच आम्हाला झाली होती. पण जेव्हापासून पाऊस आपल्या क्षमतेने पडू लागला, तेव्हापासून चर्चेत आली ती झाडे! ती व्यक्तीही मुंबईची आणि झाडेही मुंबईचीच! त्या व्यक्तीच्या चर्चेकडे राजकीय मनोरंजन म्हणून पाहिजे जाते, पण ज्या झाडांची चर्चा सध्या होते आहे, ती झाडे नाहक बदनाम होताहेत, त्याचे काय? म्हणे, झाडांनी बळी घेतले... झाडांनी नुकसान केले. खरंच हे नुकसान झाडांनी केले आहे का? याचा विचार करण्याची गरज आहे. मुंबईत अवघ्या ६ दिवसात ११०० झाडे पावसामुळे उन्मळून पडली. काही झाडांच्या खाली लोकांचे जीव गेले तर काही ठिकाणी नुकसान झाले. यासाठी केवळ झाडांना दोष देऊन तुम्ही मोकळे होणार का? जी झाडे वर्षानुवर्षापासून नि:स्वार्थपणे उभी आहेत. तुमचा श्वास चालावा म्हणून प्राणवायू देण्याचे काम अव्याहतपणे करीत आहेत, त्यांच्या माथी सर्व खापर फोडण्याइतके स्वार्थी आपण कसे होऊ शकतो?
झाडांची ही अवस्था का झाली, यावर चिंतन-मंथन करण्यास कोणत्याही शास्त्रीय संशोधनाची गरज नाही. आज आम्ही भौतिक सोयी-सुविधांच्या नादात सिमेंट काँक्रीटीकरणाच्या मागे वाहवत गेलो आहोत.oxygen producing trees शहराचे सुशोभीकरण करताना फूटभर जमीनही दिसू नये, अशा पद्धतीने सिमेंटचे जाळे आम्ही पसरवू लागलो आहोत. मगं काय, झाडांच्या सभोवताल असलेली माती संपली, मातीतून झाडांच्या मुळांपर्यंत जाणारी हवा थांबली, मुळांना मिळणारे ऑक्सिजन बंद झाले. परिणामी मुळांची वाढ खुंटली. झाडांची मुळे आतल्या आत गुदमरू लागली. सिमेंटमुळे पाण्याचा पाझर थांबला. मातीतील पोषक तत्त्व मुळांपर्यंत पोहोचण्यास बाधा निर्माण झाली. ती कमकुवत होऊन पकड सैल झाली व आज जराही वारा आली की ती पडू लागली.
आज झाडे पडून झालेले मृत्यू आणि नुकसान झाडांच्या माथी मारले गेले; पण खरंच यासाठी केवळ झाडेच दोषी आहेत का हो? हरित लवाचा नियम आहे की झाडांच्या बुंध्यापासून ४ ते ६ मीटरपर्यंत कोणत्याही प्रकारचे सिमेंट काँक्रीटचे काम करू नये, पण आम्ही झाडांना खेटून बांधकाम करतो. जमिनीत मुरणारे पाणी थांबवितो, मातीतून झाडांच्या मुळांना जाणारे ऑक्सिजनही थांबवितो. चुका आम्ही करतो, पण माथी मारताना आम्हाला झाडेच दिसतात.
केलेल्या चुकींचे क्षालन करण्याची प्रथा आमच्या संस्कृतीत आहे. कदाचित म्हणूनच डेहराडूनसारख्या शहरात आता झाडांच्या बुंध्याभोवताल असलेले सिमेंटी बांधकाम तोडण्याचा प्रयोग हाती घेण्यात आला आहे. हे करून त्या ठिकाणी झाडांचा श्वास मोकळा करण्याचे काम केले जात आहे. मग आम्ही या मार्गाने का चालू शकत नाही. आज याची गरज ग्रामीणपेक्षा शहरी भागात अधिक आहे. काँक्रीटीकरणाच्या हव्यासात निसर्गालाच आव्हान द्यायला आम्ही निघालो आहोत. नागरिक म्हणूनही आम्ही जाणीवशून्य झालो असल्याने अशा कामांना विरोध करण्याचे धाडस दाखवत नाही. आज आमची कृती झाडांची मुळेच कमकुवत करीत नाही, तर जलपुनर्भरणाचा प्रश्नही ऐरणीवर आणत आहे. कोणत्याही शास्त्रीय आधाराशिवाय वर्षानुवर्षापासून हे पाहत आलेल्या आपल्या पूर्वजांनाही कदाचित हे आपले वागणे चुकीचे वाटत असावे. आज डेहराडूनमध्ये जर झाडांचा गुदमरणारा श्वास मोकळा करण्यासाठी पुढाकार घेतला जाऊ शकत असेल तर आम्ही मागे का राहावे? ज्याला कोणतेही तंत्रज्ञान लागत नाही, अशा गोष्टीही आम्ही करणार नसू आणि केवळ झाडांमुळे जीव गेले म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात त्यांना उभे करणार असू तर आयुष्यभर त्या झाडांकडून मिळणारा प्राणवायू घेत स्वतःचा श्वास जगविण्याचा अधिकार तरी आपला आहे का? याचा विचारही केला गेला पाहिजे.
९७६३७१३४१७