दुर्दैव... 7 जणांचा बुडून मृत्यू

    दिनांक :08-Jul-2026
Total Views |
मुंबई
panvel rain मुसळधार पावसाने राज्यातील अनेक भागांना झोडपून काढले असून, नद्या-नाले आणि तलावांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक तलाव दुथडी भरून वाहू लागले आहेत. सततच्या पावसामुळे विविध ठिकाणी दुर्घटना घडत असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे, जपून प्रवास करण्याचे आणि पाण्याच्या ठिकाणी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, तरीही पावसाळ्यातील दुर्घटनांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागत आहे.
 

panvel rain tragedy 7 people die due to drowning incidents in four days 
पनवेल तालुक्यात गेल्या चार दिवसांत घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये सात जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. करंजाडे, आपटा, दिघाटी, खारघर आणि धोदाणी परिसरात या दुर्घटना घडल्या असून, या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, 2 जुलै रोजी करंजाडे येथील एका इमारतीच्या लिफ्टसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून परेश ढोले (वय 36) यांचा मृत्यू झाला. पावसाच्या पाण्याने भरलेल्या या खड्ड्यात बुडून त्यांचा जीव गेला. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
 
 
यानंतर 3 जुलै रोजी खारघर येथील panvel rain पांडवकडा धबधबा परिसरात दोन तरुण पाण्याच्या जोरदार प्रवाहाच्या तडाख्यात सापडले. मोहम्मद शाहिद (रा. तळोजा फेज-1) आणि शेंणोन गॅसपर किनी (रा. सांताक्रूझ, मुंबई) हे दोघे पाण्यात वाहून गेले. त्यांची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले, मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही.दुर्घटनांची मालिका त्यानंतरही कायम राहिली. 4 जुलै रोजी आपटा येथील प्रज्वल प्रदीप कांबळे (वय 15), हा दहावीचा विद्यार्थी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्याचा शोध सुरू होता. अखेर 5 जुलै रोजी उरण तालुक्यात त्याचा मृतदेह आढळून आला.याच दिवशी दिघाटी येथील मच्छिंद्र गणपत गावंड हेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
 
 
दरम्यान, 5 जुलै रोजी धोदाणी गावातील panvel rain वाघाची वाडी परिसरात नदीत पोहण्यासाठी गेलेल्या सुमित पवार आणि नयन म्हात्रे (रा. विचुंबे) या दोघांचा बुडून मृत्यू झाला. अवघ्या चार दिवसांत सात जणांचा बळी गेल्याने पनवेल तालुक्यात पावसाळ्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.पावसाळ्यात नद्या, नाले, धबधबे आणि धरण क्षेत्रांमध्ये अचानक पाण्याचा प्रवाह वाढतो. अशा ठिकाणी पोहण्याचा मोह अनेकदा जीवघेणा ठरतो. त्यामुळे नागरिकांनी धोकादायक जलस्रोतांपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.विशेषतः दारूच्या नशेत पाण्यात उतरणे, खोल पाण्यात जाणे किंवा सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे टाळावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पावसाळ्यातील आनंद निष्काळजीपणामुळे दुःखात बदलू शकतो, त्यामुळे नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.