इस्लामाबाद,
preparing for the struggle for water सिंधू जल करारा अंतर्गत सीमापार नद्यांचे निर्बाध पाणी मिळवणे पाकिस्तानचा अधिकार आहे. नदीचा एक थेंबही कोणी रोखू शकणार नाही, पाकिस्तान या मुद्यावर संघर्ष करण्यासाठी सज्ज असल्याची धमकी लष्करप्रमुख असमी मुनीर यांनी दिली आहे. रावळपिंडी येथील जनरल हेडक्वार्टर्समध्ये झालेल्या कॉर्प्स कमांडर्स कॉन्फरन्समध्ये सिंधू पाणी कराराचा मुद्दा उपस्थित करताना मुनीर म्हणाले की, पाकिस्तान प्रत्येक स्तरावर या मुद्याचा पाठपुरावा करण्यासाठी तयार आहे. पाकिस्तानी जनतेवर कुठल्याही परिस्थितीत दुष्काळाची परिस्थिती ओढावणार नाही. सिंधू करारानुसार सीमेवरून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी मिळवण्याचा पाकिस्तानला अधिकार आहे. या करारानुसार पाकिस्तानला मिळणारे पाणी कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कुठल्याही परिस्थितीसाठी पाकिस्तानी सैन्यदल सज्ज आहे. व्याप्त काश्मीरातील नागरिकांना भडकवण्यासाठी परदेशी शक्ती सक्रिय आहे. तेथील परिस्थिती नियंत्रणात असून, सुरक्षा दलाने हिंसेत सहभागी असलेल्यांवर कारवाई सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.
सीमेवर घुसखोरीच्या शक्यता
मुनीर यांनी सिंधू पाणी करारावर केलेल्या वक्तव्यानंतर, नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर संभाव्य घुसखोरीच्या शक्यता असून, सुरक्षा यंत्रणांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये दक्षता वाढवली आहे. बीएसएफने सांबा आणि कठुआ सेक्टरमध्ये बोगदेविरोधी कारवाया तीव्र केल्या असून निगराणी आणि तांत्रिक पाळत अधिक मजबूत केली आहे. सुरक्षा यंत्रणांच्या मते, व्याप्त काश्मीरमधील अंतर्गत परिस्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान सीमावर्ती भागात दहशतवादी कारवाया भडकवण्याचा प्रयत्न करू शकतो.
मुनीरच्या योजना हाणून पाडल्या जातील: ब्रिगेडियर जमवाल
मुनीरच्या टिप्पणीवर बोलताना निवृत्त ब्रिगेडियर राजेंद्र सिंह जमवाल म्हणाले, पाकिस्तानी लष्कराने दहशतवादाचा एक सामरिक शस्त्र म्हणून फार पूर्वीपासून वापर केला आहे, परंतु आता त्याची व्याप्ती अधिकाधिक मर्यादित होत आहे. सुरक्षा यंत्रणा संपूर्ण दहशतवादी नेटवर्क, संशयास्पद सीमापार हालचाली आणि संभाव्य घुसखोरीच्या प्रयत्नांवर सतत लक्ष ठेवून आहेत. पाकिस्तान नवीन पद्धतींचा अवलंब करण्याचा प्रयत्न करू शकते, परंतु केंद्र सरकारचे कडक सुरक्षा धोरण, तांत्रिक पाळत आणि सुरक्षा दलांच्या समन्वित कारवाईमुळे मुनीरच्या योजना हाणून पाडल्या जातील.
संयुक्त शोध मोहीम सुरू
सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, भीरतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफने जम्मू आणि काश्मीरमधील अनेक संवेदनशील भागांमध्ये संयुक्त शोध आणि घेराबंदी मोहीम तीव्र केली आहे. शोपियान, राजौरी आणि डोडा येथे संभाव्य घुसखोरीच्या माहितीनंतर सुरक्षा दल हाय अलर्टवर आहेत. पालनवाला तसेच नियंत्रण रेषेलगतच्या नदी आणि ओढ्यांच्या मार्गांवरही दक्षता वाढवण्यात आली आहे.