पुसद तालुक्यातील मूलभूत सुविधा प्रश्न केव्हा सुटणार..?

निरंजन नाईकांचा लाेकप्रतिनिधींना खडा सवाल

    दिनांक :08-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद, 
niranjan-naik : संपूर्ण महाराष्ट्रासाेबतच पुसदचा विकास व्हावा असे माझे वडील वसंतराव नाईक यांचे स्वप्न हाेते. मात्र, 57 वर्षानंतरही तालुक्यातील पाणी, रस्ते, आराेग्य, शिक्षण यासारखे मूलभूत प्रश्न अजूनही सुटले नाही याची खंत वाटते. गाेरगरीब जनतेचे प्रश्न कुणी साेडवत नाही. जनतेने माेठ्या विश्वासाने निवडून दिले आहे, अशा स्थितीत सत्तेत राहून प्रश्न सुटत नसेल तर लढा देण्याची तयारी आहे, असे परखड मत निरंजन नाईक यांनी व्यक्त केले.
 
 
y8July-Niranjan-Naik
 
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै राेजी ते पुसदला आले असता त्यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. मी आतापर्यंत मुंबईला माझे कार्यालय सांभाळत हाेताे. त्यामुळे माझा संपर्क नव्हता. परंतु दाेन वर्षांपूर्वी आदित्य जाधव यांनी मूलभूत सुविधांच्या अभावाचे चित्र व्हिडिओच्या माध्यमातून मांडले. त्यामुळे माझ्या वडिलांच्या गावात मी पाेहाेचलाे. लाेकांनी माझ्याकडे व्यथा व्यक्त केल्यात.
 
 
नंतर माझी पत्नी मीना यांनी पुसदमधील शेंबाळपिंपरी, बेलाेरा, काळी दाैलतखान या तीन मंडळांमधील 25 गावांचा दाैरा केला. कुठे दगडांचे रस्ते, पिण्याच्या पाण्यासाठी लहान मुलींच्या डाेक्यावर हंडे, महिलांसाठी शाैचालय नाही, हाॅस्पिटलची इमारत धूळ खात, तर अंगणवाडीची दुरावस्था अशी दारुण अवस्था पाहून वाईट वाटते.
 
 
हे प्रश्न का सुटत नाही, याचे आश्चर्य वाटते. प्रशासनाच्या लक्षात आणून देऊनही कुठलीही कारवाई हाेत नाही. जर कर्मचारी ऐकत नसेल तर त्यांच्यावर कायद्याचा बडगा उभारा. वसंतराव नाईक प्रशासनातील कामचुकार व्यतींना रागवत. एरवी शांत असलेले वसंतराव कुणावर चिडत नसत. मात्र, काम करून घेण्यासाठी ताकीद देत.
 
 
हे बघा, चांगले काम केले तर लाेकांचे प्रेम मिळेल, लाेक आदर करतील. पुसदची जनता भाेळी आहे. प्रश्न सुटले नाही तरीही झाेळीत मते टाकतात. जे चुकीचे राजकारण करतात त्यांना माझ्या वडिलांचे नाव वापरण्याचा अधिकार नाही, या शब्दात त्यांनी तीव्र भावना मांडल्या.
 
 
लाेकांचे हाल बघवत नसल्याने या समस्या साेडण्यासाठी मुख्यमंत्री तसेच मंत्री गिरीश महाजन यांना मंत्रालयात निवेदन दिले. मात्र अपेक्षित प्रतिसाद अजूनपर्यंत मिळाला नाही. एका प्रश्नाच्या उत्तरात निरंजन नाईक म्हणाले, आमच्या कुटुंबात कुठलाही दुरावा नाही, वैयक्तिक शत्रुत्व नाही.
 
 
केवळ गाेरगरिबांचे प्रश्न काेणी उचलत नाही म्हणून पुसदला दाेन वेळा आलाे. प्रश्न समजून घेतले पाहिजे तरच मार्ग निघू शकताे. कुटुंबातील नव्हे, तर काही लाेक अफवांच्या वावड्या उठवतात, त्याला काही अर्थ उरत नाही, असे त्यांनी सांगितले. या पत्रपरिषदेला आदित्य जाधव, शेषराव राठाेड उपस्थित हाेते.