मुंबई,
Rain in the state for 5 days. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर पुढील काही दिवसही कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने ८ जुलै ते १२ जुलै या कालावधीत राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला असून, विविध जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.यंदा मान्सून राज्यात अपेक्षेपेक्षा उशिरा दाखल झाला होता. सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, गेल्या पाच दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, अनेक नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण जून महिन्यात अपेक्षित असलेला पाऊस १ ते ६ जुलै या कालावधीतच अनेक भागांत नोंदवला गेला आहे.

८ जुलै रोजी नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, अहिल्यानगर, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट आणि पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि नाशिकलाही येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट आणि सातारा घाट परिसरासाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. ९ जुलै रोजी नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर घाट, पुणे, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, नाशिक घाट आणि पालघर येथे येलो अलर्ट राहणार आहे. सातारा घाट आणि पुणे घाटासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
१० जुलै रोजी विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ११ जुलै रोजीही नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली येथे येलो अलर्ट कायम राहणार आहे. १२ जुलै रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांमध्येही येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, या भागांमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने विशेषतः रेड अलर्ट असलेल्या भागातील नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. अतिवृष्टी, वीजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.