भूस्खलनाचा जलवाहिनीवर घाव

साताऱ्याची तहान वाढली

    दिनांक :08-Jul-2026
Total Views |
सातारा
satara water supply सातारा शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला असून सांबरवाडी परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला तीन ठिकाणी तडे गेले आहेत. या बिघाडामुळे शहराच्या पश्चिम भागातील अनेक परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
 

satara water supply disrupted after landslide damages main pipeline tanker services increased 
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे डोंगर उतारावरील माती जलवाहिनीवर कोसळली आणि त्यामुळे पाइपलाइनवर मोठा दाब निर्माण झाला. परिणामी मुख्य जलवाहिनीला तीन ठिकाणी तडे जाऊन मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीची कामे हाती घेतली.मात्र, मुसळधार पाऊस, चिखल आणि जलवाहिनीतून सुरू असलेली सततची गळती यामुळे दुरुस्तीचे काम अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर विशेष तांत्रिक कौशल्याची आवश्यकता लक्षात घेऊन पुण्यातील आयात इंजिनिअरिंग कंपनीच्या पाच सदस्यीय तज्ज्ञ पथकाला साताऱ्यात पाचारण करण्यात आले आहे. हे पथक जलवाहिनीतील तडे वेल्डिंगच्या साहाय्याने दुरुस्त करून पाइप पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर करत आहे.पालिकेचे अभियंता शहाजी वाठारे तसेच पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी satara water supply  दिवसभराची शासकीय कामे पूर्ण केल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी थांबून दुरुस्तीच्या कामावर लक्ष ठेवत आहेत. मुख्य जलवाहिनी पूर्ववत होईपर्यंत संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.या बिघाडाचा परिणाम पावर हाऊस, खाण टाकी, कात्रेवाडा आणि गणेश टाकी या जलसाठ्यांवरही झाला असून तेथे अपेक्षित प्रमाणात पाणी पोहोचत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गुरुवारीही शहराच्या पश्चिम भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन नगरपालिकेने गेल्या दोन दिवसांत १०२ टँकर फेऱ्या केल्या आहेत. एक्सप्रेस लाईनवरून नियमित पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा प्रयत्न होत असला, तरी मागणीच्या तुलनेत उपलब्ध पाण्याचे प्रमाण अपुरे पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.मुख्याधिकारी विनोद जळक यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन करत दुरुस्तीचे काम शक्य तितक्या वेगाने पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असल्याचे सांगितले. तसेच पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पाण्याचा जपून वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.