मुंबई,
Schools in Maharashtra closed शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न आणि शिक्षकांवर सोपविण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांच्या निषेधार्थ राज्यातील शिक्षक संघटनांनी गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी राज्यव्यापी 'शाळा बंद' आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेसह विविध मध्यवर्ती शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला असून, राज्यभरातील शाळांमधील शैक्षणिक कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.शिक्षक संघटनांच्या मते, शिक्षकांना वारंवार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) तसेच इतर प्रशासकीय जबाबदाऱ्या देण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत असून, शिक्षकांवरील कामाचा ताणही वाढत आहे. शिक्षकांना अशा अशैक्षणिक जबाबदाऱ्यांमधून पूर्णपणे मुक्त करण्यात यावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेसाठी बीएलओ म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना वेळ मिळावा यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने ३० जुलैपर्यंत राज्यातील शाळा शक्यतो सकाळच्या सत्रात भरविण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातील परिपत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी जारी केले आहे.मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने शिक्षण विभागाला पाठविलेल्या पत्रात बीएलओ म्हणून नियुक्त शिक्षकांच्या अध्यापनाच्या तासिका शक्यतो कमी आणि सलग ठेवाव्यात, तसेच ज्या शाळांमध्ये सकाळ आणि दुपार अशी दोन सत्रे आहेत, त्या शाळा ३० जुलैपर्यंत शक्यतो सकाळच्या एकाच सत्रात भरविण्याचे नियोजन करावे, असे नमूद करण्यात आले आहे. बीएलओ म्हणून नियुक्त नसलेल्या शिक्षकांनीही संबंधित शिक्षकांना सहकार्य करावे, जेणेकरून अतिरिक्त ताण कमी होईल, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
शिक्षक संघटनांनी मात्र शाळेचे काम आणि बीएलओची जबाबदारी एकाच वेळी सांभाळणे हा शिक्षकांचा मानसिक आणि शारीरिक छळ असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अशैक्षणिक कामे तातडीने बंद करण्यात यावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी शासनाकडे केली आहे.राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज अनेक ठिकाणी शाळांमधील अध्यापनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 'शिक्षक एकता जिंदाबाद', 'न्याय मिळालाच पाहिजे' आणि 'शिक्षण वाचवा, शिक्षक वाचवा, भविष्य घडवा' अशा घोषणांसह राज्यभरातील शिक्षक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होणार असल्याचे शिक्षक संघटनांनी सांगितले आहे.