मुंबई,
Sensex plunged by 1,878 points अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा वाढलेल्या तणावाचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा शस्त्रसंधी करार संपुष्टात आल्याचे जाहीर केल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्याचा परिणाम म्हणून बुधवारी भारतीय शेअर बाजारात मोठी विक्री झाली आणि सेन्सेक्स तसेच निफ्टी दोन्ही निर्देशांक मोठ्या घसरणीसह बंद झाले. दुपारी सुमारे २ वाजेपर्यंत बीएसई सेन्सेक्स सुमारे १,८०० अंकांनी म्हणजेच २.०५ टक्क्यांनी घसरून ७६,५७० अंकांवर व्यवहार करत होता. त्याचवेळी एनएसई निफ्टी ४९३ अंकांनी किंवा २.०३ टक्क्यांनी घसरून २३,९०७ अंकांवर पोहोचला होता. दिवसअखेर बाजारातील घसरण आणखी वाढली आणि सेन्सेक्स १,८७८.२६ अंकांनी म्हणजेच २.४० टक्क्यांनी घसरून ७६,३०२.४६ अंकांवर बंद झाला. निफ्टी ५० निर्देशांकही २४ हजारांच्या महत्त्वाच्या पातळीखाली घसरला.
या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी घट झाली. मंगळवारी गुंतवणूकदारांची एकूण संपत्ती ₹४८०.२० लाख कोटी होती. ती बुधवारी ₹८.५६ लाख कोटींनी कमी होऊन ₹४७१.६४ लाख कोटींवर आली. त्यामुळे लाखो गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला.बाजारातील घसरणीचा परिणाम अनेक आघाडीच्या कंपन्यांच्या शेअर्सवर झाला. इंटरग्लोब एव्हिएशन, एचयूएल, मारुती सुझुकी, आयटीसी, एशियन पेंट्स, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट आणि ॲक्सिस बँक यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली गेली. व्यवहारादरम्यान सेन्सेक्समधील सर्वच प्रमुख शेअर्स लाल निशाणावर होते.
दरम्यान, अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनाही मोठी चालना मिळाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर ब्रेंट क्रूडच्या किमती एका रात्रीत सुमारे ६ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ७८ डॉलरवर पोहोचल्या. याचा परिणाम आगामी काळात जागतिक अर्थव्यवस्थेसह भारतावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे जगाचे लक्ष लागले आहे. ही सामुद्रधुनी बंद झाल्यास भारतासह अनेक देशांच्या इंधन पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे इंधनाच्या किमती वाढण्याबरोबरच महागाईचाही दबाव वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.