अहेरी,
aheri महावितरण कंपनीकडून सध्या सर्वत्र बसविण्यात येत असलेल्या नवीन स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य नागरिक, गरीब शेतकरी कमालीचे त्रस्त झाले असून, या मीटरमुळे वीज बिलात अनपेक्षित वाढ होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पृष्ठमीवर, आलापल्ली विभागातील नवीन स्मार्ट मीटर तात्काळ काढून त्याऐवजी पूर्वीचेच जुने मीटर पुन्हा बसविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हा प्रमुख (अहेरी विधानसभा क्षेत्र) दिलीप सुरपाम यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. या संदर्भात आज, 8 जुलै रोजी महावितरणच्या आलापल्ली विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी निवेदन देताना शिवसेना अहेरी जिल्हाप्रमुख मिंटू सय्यद, उपतालुका प्रमुख रुपेश बंदेला, संतोष अग्रवाल, अक्षय तुंबडे, नंदकिशोर मानकर आणि परशुराम गंजीवार यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. शिवसेना अहेरी विधानसभा कार्यालय, आलापल्ली येथे अहेरी, भामरागड, मुलचेरा, एटापल्ली, चामोर्शी आणि सिरोंचा या सहा तालुक्यांतील नागरिकांनी स्मार्ट मीटरबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी नोंदविल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेत दिलीप सुरपाम व उपस्थित पदाधिकार्यांनी महावितरण प्रशासनाला चेतावणी दिली आहे की, येत्या 15 दिवसांत या सहाही तालुक्यांतील नवीन स्मार्ट मीटर काढून जुने मीटर पूर्ववत न केल्यास पक्षाच्या वतीने थेट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनामुळे उद्भवणार्या परिस्थितीला सर्वस्वी महावितरण कंपनीचा आलापल्ली विभाग जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.